औरंगाबाद : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक, 'क' विभागाने अवैधपणे दारु विकणे, ग्राहकांना दारु पिण्यास जागा उपलब्ध करुन देत असलेल्या दोन ढाब्यांवर छापा मारीत मालकांसह आठ मद्यपींना पकडले. या आरोपींच्या विरोधात प्रथमवर्ग न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर संबंधितांना ५६ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली.
राज्य उत्पादन शुल्कच्या 'क' विभागाचे निरीक्षक नारायण डहाके यांच्या पथकाने हॉटेल संग्राम, ताजनापुर रोड, बाजार सावंगी, ता. खुलताबाद याठिकाणी छापा मारला. या छाप्यात मालक अतुल विश्वंभर जल्लार (रा. बाजारसावंगी) हा हॉटेलमध्ये अवैध दारु बाळगताना आढळला. तसेच तीन ग्राहकांना दारु पिण्यासाठी बसण्याची व्यवस्था करुन दिल्याचे आढळले. पकडलेल्या चौघा आरोपींच्या विरोधात १० ऑक्टोंबर रोजी खुलताबाद येथील प्रथमवर्ग न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयाने मालकाला २५ हजार आणि तीन मद्यपींना प्रत्येकी ५०० रुपये असा एकुण २६ हजार ५०० रुपये दंड ठोठावला. दुसरी कारवाई भरारी पथकाचे निरीक्षक विजय रोकडे यांनी केली. मिटमिटा-पडेगाव रोडवरील हॉटेल न्यू खुशी याठिकाणी छापा मारला.
तेव्हा हॉटेलचे मालक फुलचंद दुबिले यांच्यासह पाच मद्यपिंना अवैध दारुसह पकडले. या सहा आरोपींच्या विरोधात औरंगाबाद येथील प्रथमवर्ग न्यायालयात ११ ऑक्टोंबर रोजी दोषारोपपत्र दाखल करीत आरोपींना हजर केले. न्यायालयाने हॉटेल मालकास २५ हजार आणि पाच मद्यपिंना प्रत्येक १ हजार रुपये असा एकुण ३० हजार रुपये दंड ठोठावला. ही कामगिरी अधीक्षक झगडे यांच्या मार्गदर्शनात 'क' विभागाचे निरीक्षक नारायण डहाके, भरारी पथकाचे विजय रोकडे, दुय्यम निरीक्षक एस.बी. रोटे, ए.ई.तातळे, सहायक दुय्यम निरीक्षक प्रविण पुरी, जवान युवराज गुंजाळ, रविंद्र मुरडकर, शारेक कादरी, अमित नवगिरे, अमोल अन्नदाते, सचिन पवार, संजय गायकवाड यांच्या पथकांनी केली.