औरंगाबाद : पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना- भाजपने जोरदार प्रचार सुरू केला आहे. शहरात राजकीय मिळावे घेण्यात येत आहेत. या मेळाव्यामध्ये राजकीय पक्षांकडून कोरोनाच्या नियमांची एैशीतैसी करण्यात येत आहे. या प्रकाराबद्दल महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी उघडपणे नाराजी व्यक्त केली. निवडणूक निर्णय अधिकारी, आचारसंहिता कक्ष याची उचित दखल घेईल, अशी अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक १ डिसेंबर रोजी आहे. महाआघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे औरंगाबाद शहरातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. एका हॉटेलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यासाठी महाआघाडीतील कार्यकर्त्यांनी अलोट गर्दी केली होती. याच मतदारसंघातील भाजपचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्याला मोठी गर्दी होती. तापडिया नाट्यमंदिर पूर्णपणे भरले होते. व्यासपीठावरदेखील कार्यकर्ते- पदाधिकाऱ्यांची गर्दी होती. विशेष बाब म्हणजे कार्यकर्त्यांनी मास्कचासुद्धा वापर केला नाही. यासंदर्भात लोकमत वृत्तपत्र समूहाने कोरोना नियमांची राजकीय पक्षांकडून कशा पद्धतीने एैशीतैसी करण्यात येत आहे, यावर छायाचित्रांसह प्रकाश टाकला होता. याची गंभीर दखल मंगळवारी महापालिका प्रशासन आस्तिककुमार पाण्डेय यांनी घेतली. त्यांनी उघडपणे नाराजीही दर्शविली.
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा धोका असताना अशी गर्दी योग्य नाही, असे ते म्हणाले. बिहारच्या निवडणुकीत प्रचार सभा, बैठकांमधून अशीच गर्दी होत होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने तेथे सुमारे १५० गुन्हे दाखल केले. तापडिया नाट्यमंदिरातील भाजप मेळाव्यात झालेली गर्दी, मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाईन सभेचीदेखील निवडणूक आयोग, निवडणूक निर्णय अधिकारी, आचारसंहिता कक्ष योग्य दखल, घेईल अशी आशादेखील त्यांनी व्यक्त केली.