बीड : महायुतीतील शिवसंग्रामने बीड विधानसभेच्या शिवसेनेच्या जागेवर दावा केलेला असल्याने बीड विधानसभेची जागा शिवसंग्रामला सुटणार अशी चर्चा सुरू आहे. परंतु मंगळवारी शिवसेनेचे खा. आढळराव पाटील यांनी बीडची जागा शिवसेनेकडेच असेल, असा दावा केल्याने आता बीड मतदार संघावर शिवसंग्राम की शिवसेना असा संभ्रम निर्माण झाला आहे़जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी मंगळवारी शिवसेनेच्या खासदारांचे पथक बीड जिल्हा दौऱ्यावर आले होते. या पथकात शिरूरचे खा. आढळराव पाटील, कल्याणचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे व खा. श्रीरंग बारणे यांचा समावेश होता. जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघापैकी एकमेव बीडची जागा मागील अनेक वर्षापासून शिवसेनेकडे आहे. शिवसंग्रामने बीड विधानसभा जागेवर दावा केलेला आहे. ही जागा शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे लढविण्याच्या तयारीत आहेत. खा. आढळराव पाटील पत्रकारांशी म्हणाले, बीडची जागा सोडण्याचा प्रश्नच नाही़ ही जागा आधीपासून सेनेकडेच आहे़ सेना नेते उध्दव ठाकरे हेच याबाबत अधिकृत निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले़ खा. पाटील यांनी बीड विधानसभा मतदारसंघाच्या जागेवर सेनेचा दावा केल्याने ही जागा नेमकी कोण लढविणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे़ (प्रतिनिधी)
बीडच्या जागेवर सेनेचा दावा कायम
By admin | Published: August 27, 2014 1:34 AM