औरंगाबाद : आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक प्रा. अविनाश डोळस यांचे आज सकाळी सहा वाजता वयाच्या ६७ वर्षी निधन झाले. प्रा. डोळस राज्य सरकारच्या डॉ. आंबेडकर चरित्र, साहित्य व प्रकाशन समितेचे सदस्य सचिव होते.
प्रा. डोळस यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता छावणी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. आंबेदिंडोरी (ता.दिंडोरी, जि.नाशिक) येथील प्रा . अविनाश डोळस हे औरंगाबादेतील नंदनवन कॉलनी, भावसिंगपुरा येथे रहात होते. त्यांचा जन्म ११ डिसेंबर १९५० रोजी झाला होता.
मिलिंद महाविद्यालयात मराठी विषयाचे ते प्राध्यापक होते. मराठी विभागप्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले. विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनात त्यांचा सहभाग होता. भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन महासंघाचे नेते असलेले डोळस हे दलित, कष्टकरी वर्गाच्या हक्कांसाठी लेखणीही समर्थपणे चालवणारे साहित्यिक होते.
जानेवारी 1990 मध्ये नांदेड येथे भरलेल्या पाचव्या अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. जानेवारी 2011मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथे भरलेल्या 12 व्या आंबेडकरी साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते.
यासह विविध संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. त्यांचे विविध साहित्य प्रकाशित झालेले असून विविध पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.
आधारस्तंभ : प्राचार्य ल.बा. रायमाने, आंबेडकरी चळवळ : परिवर्तनाचे संदर्भ, आंबेडकरी विचार आणि साहित्य, महासंगर (कथासंग्रह), सम्यकदृष्टीतून... अशी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.