औरंगाबाद : दोन ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरविण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निकालााला आव्हान देण्यात आलेल्या अपीलाचा निकाल जैसे थे लावून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे ५० हजार रुपये लाचेची मागणी करून ४० हजार रुपये लाच घेताना अप्पर विभागीय आयुक्तलयातील वरिष्ठ सहायकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवारी दुपारी विभागीय आयुक्तालयात करण्यात आली.
सचिन लक्ष्मण पंडित (३७)असे अटकेतील वरिष्ठ सहायकाचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक बी.व्ही.गावडे यांनी सांगितले की,तक्रारदार हे ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांच्या तक्रारीवरून गावातील दोन ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले होते. जिल्हाधिकारी यांच्या निकालाविरोधात त्या दोन सदस्यांनी अप्पर विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. या अपीलावर माननीय अप्पर विभागीय आयुक्त यांच्यासमोर सुनावणी सुरू झाली होती. यामुळे तक्रारदार हे सुनावणीसाठी तेथे हजर राहात. दरम्यान तेथील वरिष्ठ सहायक सचिन पंडित हे तक्रारदार यांना भेटले आणि या केसचा निकाल तुमच्या बाजूने लावून देण्यासाठी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. ही तक्रार प्राप्त होताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन पंच पाठवून लाचेच्या मागणीची पडताळणी केली तेव्हा आरोपी पंडितने तडाजोड करीत तक्रारदार यांच्याक डून ४० हजार रुपये लाच घेण्याची तयारी दर्शविली.
१३ नोव्हेंबर रोजी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यानी विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात सापळा रचला. तेव्हा आरोपी सचिन पंडित यांनी तक्रारदार यांच्याकडून ४० हजार रुपये म्हणून घेतली. सचिन पंडित यांनी लाचेची रक्कम घेताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर अधीक्षक अनिता जमादार, उपअधीक्षक गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक उन्मेश थिटे यांनी केली. कर्मचारी संदीप आव्हाळे, संतोष जोशी, मिलिंद ईप्पर, चालक शेख यांनी त्यांना मदत केली.