औरंगाबाद : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत शासन गंभीर असून, ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या अनुषंगाने त्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेतला आहे. औरंगाबादसह राज्यातील सर्व जिल्ह्यात प्रत्येकी एक ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. येत्या पंधरा दिवसांत जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.
कोरोना संसर्गामुळे सर्वच घटकांना फटका बसला असून, ज्येष्ठ नागरिकांचे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यांच्या सर्व अडी-अडचणी तातडीने सोडविण्यासाठी जिल्हा कक्षाच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे पुण्यात झालेल्या बैठकीत सूचित करण्यात आले आहे.
दरम्यान, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त जलील शेख यांनी सांगितले, सामाजिक न्याय भवन, अजबनगर-खोकडपुरा येथे सदरील कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. याठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी लायब्ररी, विरंगुळा केंद्र, समस्या सोडविण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा कक्ष असणार आहे. येत्या काही दिवसांत कक्ष सुरू होईल, असा दावा त्यांनी केला.