औरंगाबाद : तक्रारदारांचा सेवापट वरिष्ठांकडून पडताळणी करून देण्यासाठी ९,५०० रुपये लाच घेताना उच्च शिक्षण सह संचालक कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी दुपारी ४ वाजता शिक्षण सह संचालक कार्यालयात करण्यात आली.
ज्ञानोबा बळीराम निर्मळ (५४, रा.मातोश्री नगर, गारखेडा परिसर) असे लाचखोर वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे. याविषयी प्राप्त माहिती अशी की, तक्रारदार हे जालना जिल्ह्यातील सेवानिवृत्त ग्रंथालय परिचर आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीची फाईल सहसंचालक उच्च शिक्षण कार्यालयात आली होती. त्यांच्या सेवा पटाची पडताळणी वरिष्ठांकडून करणे गरजेचे होते. हे काम करण्यासाठी आरोपी निर्वळ यांनी तक्रारदार यांच्याकडे ९ हजार ५०० रुपये लाच मागितली. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे निर्मळची तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन पंच पाठवून लाचेच्या मागणीची पडताळणी केली. यावेळी आरोपी निर्मळ यांनी लाचेच्या रकमेत एक रुपयाही कमी घेणार नाही, असे बजावले.
ठरल्याप्रमाणे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या आवारात सापळा रचला आणि तक्रारदार यांना लाचेची रक्कम घेऊन मंगळवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास त्यांच्याकडे पाठविले. आरोपी निर्मळ यांनी तक्रारदार यांच्याकडून लाचेचे ९ हजार ५०० रुपये घेताच दबा धरून बसलेल्या साध्या वेशातील पोलिसांनी त्याना लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई जालना युनिटचे उप अधीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस.एस.शेख, पोलीस कर्मचारी गणेश चेके, जावेद शेख,गजानन कांबळे, ज्ञानेश्वर मस्के यांनी केली.