औरंगाबाद : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व विद्याव्यासंगी वि. वि. चिपळूणकर यांचे आज सकाळी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. शिक्षण क्षेत्रातील कार्य आणि 'चिपळूणकर समिती'च्या अहवालामुळे ते सर्वांना परिचित होते. राज्याचे शिक्षण संचालक म्हणून निवृत्त झाल्यानंतर चिपळूणकर शहरात स्थायी झाले होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत.
विद्याधर विष्णु चिपळूणकर यांनी राज्याचे शिक्षण संचालक म्हणून निवृत्त झाल्यानंतर राष्ट्रीय शिक्षण नियोजन प्रशासन संस्थेचे सल्लागार म्हणूनही अनेक वर्ष काम केले. त्यांचा जन्म १३ एप्रिल १९२९ रोजी विर्ले पार्ले, मुंबई येथे झाला. त्यांनी १९७६ टे १९८६ या कालावधीत राज्याचे शिक्षणसंचालक म्हणून काम पाहिले होते.
'चिपळूणकर समिती' द्वारे सर्वपरिचित वि. वि. चिपळूणकर यांनी माध्यमिक शिक्षक, शासकीय विद्यानिकेतनचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य शिक्षणसंचालक अशा विविध पदांवर काम केले होते. यासोबतच ते बालभारतीचे माजी संचालक पण होते. बालभारतीच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. राज्यात गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण देण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले. 'चिपळूणकर समिती'च्या अहवालामुळे ते सर्वदूर परिचित झाले .
शिक्षकांसाठी आजही मार्गदर्शक कार्य चिपळूणकर यांनी १९४८ मध्ये एक शिक्षक या नात्याने शिक्षणक्षेत्रात पदार्पण केले. १९८७ मध्ये ते राज्याच्या शिक्षण संचालक पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीनंतरच्या काळातही त्यांचे शैक्षणिक योगदान समाजाला लाभले. त्यांची आतापर्यंतची कारकीर्द राज्यातील शिक्षकांसाठी आजही मार्गदर्शक व प्रेरक ठरत आहे. शिक्षण क्षेत्रातील बदल आणि आव्हाने यावर त्यांनी विपुल लेखनसुद्धा केले आहे. या लेखनाचे संकलन ''कणा शिक्षणाचा' आणि ''आव्हान प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेचे'' यात करण्यात आले आहे.