नांदेड: रस्त्याच्या कामाचे निविदा स्वीकृतीची मुख्य अभियंताकडे शिफारस करण्यासाठी 6 लाख 40 हजारांची लाच स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेडच्या अधीक्षक अभियंत्यासह एका लिपिकास लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी पहाटे करण्यात आली. अभियंत्यांच्या घर झडतीत 72 लाख 91 हजार 490 रुपये जप्त करण्यात आले आहे.
लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांना हदगाव तालुक्यातील केदारगुडा, पिंगळी, डोंगरगाव, हदगाव, गोरलेगाव, गुरफळी रोड या रस्त्यांचे दोन कामांचे टेंडर मिळाले होते. सदर कामाच्या निवीदा स्विकृतीचे शिफारसीसाठी तक्रारदार सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेडचे अधीक्षक अभियंता गजेंद्र राजपूत यांना भेटले.पण राजपूत यांनी मंजूर झालेल्या दोन टेंडरचे एकुण 14 कोटी 10 लाख रूपयाच्या अर्धा टक्का 7 लाख रूपयाची मागणी केली व सदर पैसे दिले तर पुढे मुख्य अभियंता, नांदेड यांच्याकडे शिफारस करतो असे सांगितले. त्यानंतर तक्रारदार हे संबंधीत टेबलचे वरीष्ठ लिपिक विनोद कंधारे यांना भेटले असता, त्यांनी त्यांचे व त्यांचेसोबत असलेले लिपीक जयंत धावडे यांच्यासाठी प्रत्येक टेंडरचे 25 हजार रूपये असे एकुण 50 हजार रूपयांची मागणी केली. सदरचे पैसे हे लाच असल्याची तक्रारदार यांना खात्री झाल्याने त्यांना ती देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकाने तक्रारदाराला लाच मागणी पडताळणीसाठी पाठविले असता, तक्रारदार यांनी अधिक्षक अभियंता गजेंद्र राजपूत यांची भेट घेतली व सात लाख रूपये जास्त होत आहेत. काही तरी कमी करा अशी विनंती केली. राजपूत याने तडजोडीअंती सहा लाख रूपयांची लाच मागितली. त्याने सहा लाख रूपये लिपीक कंधारे याला द्यायला सांगितले. ही रक्कम स्वीकारताना कंधारेला रंगेहात पकडण्यात आले. यानंतर राजपूत याच्या कार्यालयाची व घराची लाचलुचपत विभागाने रात्री उशिरापर्यंत झाडाझडती घेतली असता यात 72 लाखांहून अधिकची रक्कम त्यांना सापडली आहे. या प्रकरणात शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.