- साहेबराव हिवराळे
औरंगाबाद : सातारा-देवळाई तसेच सिडकोत वास्तव्यास असलेल्या पेन्शनरांना पोस्ट, तसेच बँक खात्यातून पैसे काढताना गैरसोयीला तोंड द्यावे लागते. डिजिटल भारताची संकल्पना मांडली जाते; परंतु पेन्शनरांना या सुविधेचा लाभ मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
बहुतांश पेन्शनरांकडे मोबाईलवर बँकांतून कोणताही संदेश येत नाही. बँकेच्या फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता सविस्तरपणे कुणी माहिती देत नाही. बहुतांश बँकेकडून ज्येष्ठांच्या फोनकडे दुर्लक्ष केले जाते. खात्यावर रक्कम आली याविषयी माहिती सांगणे टाळले जाते. नियमाप्रमाणे महिन्याच्या पहिल्या तारखेला बँक खात्यात पैसे जमा होतात. पोस्ट खात्यात एक दिवस अगोदर त्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. कारण ज्येष्ठ नागरिकांची तसेच पेन्शनधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते. सातारा-देवळाई परिसरातील पेन्शनरला खात्यातील रक्कम काढण्यासाठी शंभर ते दोनशे रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागतो.
अपघात होण्याची भीतीही बळावते. अशी अनेक संकटे पार करीत गेल्यावर खात्यावर पैसे शिल्लक नाहीत किंवा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, यामुळे दुसऱ्या दिवशी या, असेही अनेकदा सांगितले जाते. कोरोनामुळे बहुतांश पेन्शनर यांनी गर्दीत जाणे टाळले आहे. करिता त्यांना घरपोच पेन्शनची रक्कम मिळावी. बँक व पोस्टाकडून सविस्तर माहितीचे संदेश मोबाईल यावेत, अशी अपेक्षाही व्यक्त होते. बँक किंवा पोस्ट खात्यातून पैसे काढण्यासाठी जमा आहे की नाही हेच सांगत नसल्याने मोठी गैरसोय होते. औषधी, दवाखान्यात जाण्यासाठी पेन्शनची वाट पाहावी लागते.
पेन्शनरची हेळसांड नकोसातारा-देवळाई परिसरात मोठ्या संख्येने पेन्शनर वास्तव्यास असून, त्यांना बँक किंवा पोस्टात जाणे जोखमीचे ठरत आहे. त्यांना एटीएम कार्ड द्यावे, घरी पोस्टमन पेन्शन घेऊन यावा, म्हणजे लुबाडणूक टळेल. -अनंत सोन्नेकर (पेन्शनर)
संदेश येत नाही...पासबुक घेऊन गेल्याशिवाय माहिती कळत नाही. पेन्शनरसाठी कर्मचारी नेमावा, गैरसोय टळेल.-तेजपाल पाटील (पेन्शनर)
नेट कनेक्टिव्हिटीची समस्या...पेन्शनधारकांनी हयात प्रमाणपत्र देताना आपला मोबाईल अपडेट करावा. पेन्शन नियमाप्रमाणे जमा होते. नेट चालत नसल्याने तांत्रिक अडचणी पेन्शनरला येतात. अनेकांना एटीएम कार्ड देण्यात येत आहे.-असदुल्ला शेख (टपाल मुख्यालय, सहायक अधीक्षक)