औरंगाबाद : महापालिकेतील भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी अस्थिकलश रथावर हास्यमुद्रेत सेल्फी काढल्यामुळे त्यांना वरिष्ठांनी झापले आहे. सोशल मीडियात उपमहापौरांच्या सेल्फी सोहळ्यावरून टीकेची झोड उठली आहे. त्या पदावरील व्यक्तीकडून अशा प्रकारे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलश दर्शन रथावर हास्यविनोदात फोटो काढणे योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या पूर्ण प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न भाजपच्या संघटन पदाधिकाऱ्यांकडून होत असून, उपमहापौर विजय औताडे यांनी क्लीन चीट देण्याचा हा प्रकार आहे.
सेव्हन हिलमार्गे जालन्याकडे अस्थिकलश रथ जाताना रथावरील सेल्फी सोहळ्याचे वृत्त छायाचित्रासह लोकमतने २४ आॅगस्टच्या अंकात प्रकाशित केले. त्या वृत्तानंतर भाजपमध्ये एकच खळबळ उडाली. तसे पाहिले तर औताडे हे काही मूळचे भाजपमधील नाहीत. ते २०१५ मध्ये मनपा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आल्याने त्यांना पक्षाने उमेदवारी दिली. साडेतीन वर्षांत त्यांना भाजपची कार्यसंस्कृती किती समजली हे माहिती नाही; परंतु प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या कृपाशीर्वादाने त्यांना उपमहापौरपदापर्यंत येण्याची संधी मिळाली. पक्षातील निष्ठावान, संघवादी नगरसेवकांचा रोष घेऊन खा. दानवे यांनी औताडे यांना फक्त लोकसभा मतदारसंघातील नगरसेवक असल्यामुळे पुढे आणले.
एमआयएमचे आ.इम्तियाज जलील यांनी उपमहापौरांच्या सेल्फी सेलिब्रेशनवर सोशल मीडियातून जोरदार टीका केली आहे. त्याला भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले आ.जलील यांनी त्यांच्या पक्षाचे पाहावे, आम्हाला काही सांगू नये. सोशल मीडियातून औताडे व अनिल मकरिये यांनी ज्याप्रकारे फोटोसेशन केले त्याबाबत टीका सुरू असून, याबाबत पक्ष काय कारवाई करणार याबाबत तनवाणी यांना विचारले असता ते म्हणाले, फोटो काढले तेव्हा कलश रथात होता की नाही, याबाबत काही माहिती नाही. परंतु सर्वांना फोटो काढू नका, अशी सूचना करण्यात आली होती.
भाजप पदाधिकाऱ्यांचे मत असे...भाजप जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव म्हणाले, सकाळीच उपमहापौर विजय औताडे यांना फोन करून झापले आहे. त्यांच्याकडून चुकीने हा प्रकार घडल्याचे त्यांनी नमूद केले आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.भागवत कराड यांना याप्रकरणी विचारले असता ते म्हणाले, अस्थिकलश रथावर फोटो काढू नये, अशा सर्वांना सूचना करण्यात आल्या होत्या. प्रवक्ते शिरीष बोराळकर म्हणाले, फोटो काढण्यास मनाई केली होती. परंतु घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. मात्र यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा मुद्दा नसावा. दरम्यान हे प्रकरण पक्ष किती गांभीर्याने घेणार याकडे लक्ष लागले आहे.