:मसिआ संघटनेचा पुढाकार; सेलमार्फत महिला उद्योजकांना प्रशिक्षण
मसिआचा पुढाकार : महिला उद्योजकांना देणार विविध प्रकारचे प्रशिक्षण
वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीतील महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी मसिआ संघटनेने पुढाकार घेतला आहे. उद्योजिकांसाठी स्वतंत्र सेल स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सेलमार्फत महिला उद्योजिकांना प्रशिक्षण देऊन उद्योगवाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
वाळूजच्या मसिआ सभागृहात शुक्रवारी (दि. ९) औद्योगिक क्षेत्रातील महिला उद्योजकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला मसिआचे अध्यक्ष नारायण पवार, उपाध्यक्ष अनिल पाटील, प्रसिध्दी प्रमुख राहुल मोगले, सचिव गजानन देशमुख, चेतन राऊत, राजेश मानधनी, सुरेश खिल्लारे, आदिती लामतुरे, रितिका गोयल, राधिका मानधनी, राजवी वेलंगी, निधी काळे, सुलभा थोरात, सुनीता राठी, कमल राव, वर्षा लोया आदींची उपस्थिती होती.
बैठकीत महिला उद्योजकांच्या अडचणींविषयी चर्चा करण्यात आली. औरंगाबादला नवीन उद्योगासाठी पोषक वातावरण असल्याने पुरुषांप्रमाणे महिला उद्योजिकांनी नवीन उद्योग सुरू करण्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे नारायण पवार यांनी सांगितले. या बैठकीत महिला उद्योजिकांनी आपले विचार मांडत, उद्योग सुरू करताना येणाऱ्या अडी-अडचणींचे अनुभव कथन केले.
महिलांसाठी राबविणार उपक्रम
सेलमार्फत महिला उद्योजकांसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण शिबिर, परिसंवाद, चर्चासत्र, प्रदर्शन, रोड शो, आरोग्य शिबिर, उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. याचबरोबर नवीन प्रगत तंत्रज्ञानाची माहिती महिला लघु उद्योजिकांना देऊन त्यांना तज्ज्ञामार्फत प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे मसिआचे अध्यक्ष नारायण पवार यांनी सांगितले.
फोटो ओळ
वाळूजच्या मसिआ सभागृहात आयोजित बैठकीत महिला उद्योजिकांशी चर्चा करताना मसिआचे अध्यक्ष नारायण पवार, अनिल पाटील, राहुल मोगले, गजानन देशमुख आदी.