- विजय सरवदे
औरंगाबाद : कुशल मजुरांअभावी रखडलेल्या नवीन बीड बायपास मार्गाच्या कामाने गती घेतली असून आतापर्यंत या मार्गाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. रस्त्याची कामे जवळपास पूर्ण झाली असली, तरी या रस्त्यावरील चार मोठ्या उड्डाणपुलांची कामे मात्र, शेवटच्या टप्प्यात आहेत. दरम्यान, या मार्गावर वाहतूक सुरु करण्यासाठी पूर्वी ऑगस्ट अखेरपर्यंतचे नियोजन आता महिनाभर पुढे ढकलण्यात आले आहे. सप्टेंबरअखेर यावरुन वाहतूक सुरु होऊ शकते, अशी शक्यता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी ‘ लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
सोलापूर- धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील निपाणी ते करोडी या ३० किलोमीटर लांबीच्या नवीन बायपास रोडच्या कामाला फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरुवात झाली. ‘लार्सन अँड टूब्रो’ (एल अँड टी) ही कंत्राटदार कंपनी रस्त्याचे काम करत आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे शासनाने लॉकडाऊन केले आणि सलग दोनवेळा या रस्त्याचे काम प्रभावित झाले. अलीकडच्या लॉकडाऊनमध्ये प्राधिकरण तसेच कंत्राटदार कंपनीने कामाच्या साईटवर लस उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले ; पण ती उपलब्ध होऊ शकली नव्हती. दुसरीकडे, कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्यामुळे मजुरांमध्येही अविश्वासाची भावना वाढत गेली व ते गावी निघून गेले. पुलांची उंचावरील कामे अकुशल मजुरांकडून करुन घेणे जोखमीचे असते. त्यामुळे कंत्राटदार कंपनीला कुशल मजुरांची वाट बघावी लागली. परिणामी, प्रामुख्याने वाल्मी, एएस क्लब, तिसगाव, करोडी या चार ठिकाणच्या मोठ्या उड्डाणपुलांच्या कामांची गती मंदावली. आता गावी गेलेले मजूर बऱ्यापैकी परतले आहेत. या पुलांच्या स्लॅबची कामे पूर्ण झाली असून ॲप्रोचेसची (दोन्ही बाजूच्या भिंती) कामे राहिली होती ती आता सुरु झाली आहेत.
चौकट....................
तीस किलोमीटरचा बायपास
सध्या अस्तित्वात असलेल्या जुन्या बीड बायपासला पर्याय म्हणून सोलापूर- धुळे महामार्गासाठी निपाणी ते करोडी या नवीन बीड बायपासचे (बाह्यवळण रस्ता) काम सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे आहे. हा नवीन बायपास निपाणी, गांधेली, बाळापूर, देवळाई, सातारा, कांचनवाडी (वाल्मी), वळदगाव, पंढरपूर, तिसगाव, साजापूर आणि करोडी शिवारातून जात आहे. सध्या या रस्त्याचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. निपाणी ते करोडीपर्यंत ३० किलोमीटरच्या या रस्त्यावर चार मोठे उड्डाणपूल, २९ लहान पूल, ८ व्हेईकल अंडरपास, १ व्हेईकल ओव्हरपास, पादचाऱ्यांसाठी ४ अंडरपास, जनावरांसाठी १ अंडरपास, पाणी वाहून जाण्यासाठी ९५ चाऱ्या व पाईपचे पूल असे एकूण लहान- मोठ्या १३९ पुलांची कामे पूर्ण होत आली आहेत.