लातूर : शहरातील एमआयडीसी भागात जीवनरक्षा या संस्थेच्या माध्यमातून मुक्या प्राण्याशी कायम मैत्री जोपासणाऱ्या राहूल सुवर्णकार (वय २२, रा़भक्तीनगर, आर्वी) या सर्पमित्रांचा घोणस (परड) जातीच्या सर्पदंशाने बुधवारी मृत्यू झाला आहे़लातूर शहरातील राहूल सुवर्णकार हा सर्पमित्र म्हणून अनुप लोभे यांच्याकडे प्रशिक्षण घेत होता़ त्याने कमी कालावधीत प्रशिक्षण पूर्ण करून शहरातील विविध भागात पकडलेले साप स्टंटबाजी करीत काढलेले फोटो तो फेसबूक व व्हॉट्सअॅपवर टाकायचा़ त्या फोटोवरून अनेकांनी केलेल्या लाईकमुळे तो मोठ्या उत्साहात शहर व परिसरातील कुठल्याही भागातून नागरिकांचा फोन आला की, तिथे जावून साप पकडायचा व उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करायचा़ त्यामुळे अल्पावधीत तो एक चांगला सर्पमित्र म्हणून नावारूपाला आला होता़ लातुरात सर्पमित्रांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यामध्ये तो मुक्या प्राण्याशी कायम मैत्री करणारा सर्पमित्र म्हणून नावारूपाला आला होता़ सोमवारी त्याने एमआयडीसी परिसरात घोणस जातीचा साप पकडला़ त्याला घेवून फोटोसेशनसाठी स्टंटबाजी करतांना बंद बरणीतून साप काढतांना राहूल सुवर्णकार या सर्पमित्राला सोमवारी घोणसाने दंश केला असल्याची माहिती त्याच्या सोबत असलेल्या मुखीम शेख, सोहेल तन्वीर, ओम माने यांनी दिली़ त्याला उपचारासाठी लातूरच्या एका खाजगी रूग्णालयात दाखल केले असता बुधवारी दुपारी १:०० वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला़ (प्रतिनिधी)४लातूर तालुक्यातील आर्वी येथील राहुल सुवर्णकार हा सर्पमित्र उत्साही असल्यामुळे कमी कालावधीत त्याने प्रशिक्षण पूर्ण केले आणि सापांशी मैत्री जोपासण्याचे काम करू लागला़ परंतु, सापांसोबतची स्टंटबाजी करताना त्याला सर्पदंश झाला़ उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़ याबाबत सर्पमित्र समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र तो स्वयंघोषित सर्पमित्र असल्याचे सांगितले आहे़
सर्पदंशाने सर्पमित्राचा लातुरात मृत्यू
By admin | Published: December 11, 2014 12:29 AM