औरंगाबाद : राज्याच्या महा-ई-सेवेच्या (महा-आयटी) ऑनलाइन नेटवर्कमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्याचा फटका मराठवाड्यातील सेतू सुविधा व महा-ई-सेवा केंद्रांना बसला आहे. परिणामी, विभागातील या केंद्रातून देण्यात येणाऱ्या विविध प्रमाणपत्रांची सेवा ठप्प झाली आहे.
सध्या काही अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेकांनी सेतू सुविधा केंद्रात खेट्या मारल्या असून, त्यांना प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे त्यांच्या शैक्षणिक सत्रातील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांसाठी असलेल्या नेटवर्कचे सर्व्हर डाऊन झाल्याने जात, रहिवासी, उत्पन्नासह इतर सर्व प्रमाणच्या प्रमाणपत्र देण्याची सेवा कोलमडली. गेल्या शुक्रवारपासून एकाही प्रमाणपत्रासाठी अर्ज घेण्यात आला नसून, जुन्या अर्जांची प्रमाणपत्रेदेखील ऑनलाइन वितरित झालेली नाहीत. राज्यभरातील महा-ई-सेवा ऑनलाइन यंत्रणेचे नियंत्रण मुंबईतील राज्य माहिती व तंत्रज्ञान विभागातून केले जाते. प्रत्येक विभागाचे सर्व्हर येथेच असून, काही दिवसांपासून मराठवाड्याचे सर्व्हर डाऊन झाले आहे. यासाठी लेखी पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती स्थानिक पातळीवरून देण्यात आली.
रोज किमान ३ हजार प्रमाणपत्रांचे वाटपमराठवाड्यातील सर्व सेतू केंद्रांतून सुमारे ३ हजारांहून अधिक प्रमाणपत्रे वितरित केली जातात. त्यात जात, रहिवासी, नॉन क्रिमिलिअर, उत्पन्न, ईडब्ल्यूएस, राष्ट्रीयत्व अशा विविध प्रमाणपत्रांचा समावेश आहे. रेशन कार्डासाठीदेखील सेतू केंद्रातच अर्ज करावा लागतो.
महा-ऑनलाइन सर्व्हर डाऊन
सेतू सुविधा केंद्र व्यवस्थापकांनी सांगितले, औरंगाबाद विभागाचे महा-ऑनलाइन सर्व्हर डाऊन आहे. त्यामुळे प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे व अर्जाचे स्कॅनिंगच होत नसल्याने कामकाज बंद आहे. १२ नोव्हेंबर रोजी अचानक सर्व्हर डाऊन झाले असून, ते पूर्ववत झालेले नाही. तीन दिवसांपासून सेतू सुविधा केंद्रांसह महा-ई-सेवा केंद्राचे काम ठप्प आहे. औरंगाबादमधून दररोज किमान ४०० च्या आसपास प्रमाणपत्रे वितरित होतात.