लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयातील मुद्रांक व नोंदणी शुल्क (रजिस्ट्री) कार्यालयातील सर्व्हर स्पेस नसल्यामुळे सहा महिन्यांपासून डाऊन आहे. परिणामी खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. राज्यभरात हीच अवस्था असल्याची माहिती समोर आली असून, सर्व्हर अपडेट होण्यासाठी अजून किती कालावधी लागणार असा प्रश्न आहे.नोटाबंदीनंतर औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांतील जमीन खरेदी-विक्रीवर मोठा परिणाम झाला. २०१७ च्या मध्यान्हापर्यंत व्यवहार सुरळीत झाले नव्हते. अजूनही शेतजमिनीच्या व्यवहाराचे प्रमाण नगण्य आहे. रोखीच्या व्यवहारावर अनेक निर्बंध आल्यामुळे जमिनींचे भाव गडगडले आहेत. जमिनीच्या व्यवहारांना अजूनही चालना मिळत नाही. अशातच जे थोडे-फार व्यवहार सुरू आहेत, त्यातही आॅनलाईनचे विघ्न येत आहे. रजिस्ट्री करण्यासाठी येणाऱ्या अनेकांची त्यामुळे तारांबळ होत असून, एका रजिस्ट्रीसाठी तासन्तास थांबण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. मागील पूर्ण आठवड्यात सर्व्हर डाऊन होते. या आठवड्यातही सर्व्हर डाऊनच असल्यामुळे दस्त नोंदणीच्या कामाला गती येत नाही.तालुकास्तरावरील सर्व कार्यालये रजिस्ट्री आॅफिसशी आॅनलाईन जोडलेले आहेत. तसेच विभागातील दोन जिल्हेही कनेक्ट आहेत. औरंगाबाद कार्यालय पुणे कार्यालयाशी जोडलेले आहे. राज्यभर आॅनलाईन डाटा संकलनाचे काम मंदावल्यामुळे दस्त नोंदणीवर त्याचा परिणाम झाला आहे. सहा महिन्यांपासून परिस्थिती पूर्वपदावर येईल. पूर्ण स्पीडने आॅनलाईन दस्त नोंदणी होईल, असा दावा कार्यालयाकडून केला जात आहे. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे दस्त नोंदणीला वेळ लागतो आहे. मुख्यालयापासून खालपर्यंत सर्व यंत्रणा सर्व्हर अपडेट करण्यात गुंतलेली आहे.
सहा महिन्यांपासून सर्व्हर ‘डाऊन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 1:09 AM