छत्रपती संभाजीनगर : वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आयएनआय-सीईटी परीक्षा चिकलठाणा एमआयडीसीतील एका केंद्रावर सकाळी ९ ते १२ यावेळेत रविवारी घेण्यात आली. या परीक्षेत सर्व्हरची समस्या उद्भवली.
परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना दीड तास वेळेपूर्वीच परीक्षा केंद्रात हजर राहावे लागले. मात्र, परीक्षा सुरू होण्यास सर्व्हरच्या समस्येमुळे उशीर झाल्याची माहिती परीक्षार्थींनी दिली. त्यामुळे परीक्षा संपल्यानंतर सव्वा तासाने विद्यार्थी परीक्षा केंद्राबाहेर पडले. परीक्षेत विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत परीक्षा केंद्रात असताना आयोजकांनी केवळ दोघांमध्ये पाण्याची छोटी बाटली दिली. त्यामुळे परीक्षार्थींना परीक्षेदरम्यान साधे पिण्याचे पाणीही मिळाले नसल्याचे अनेक परीक्षार्थींनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.