लातूर : शेतीमालावरील आडतवरुन बंद पुकारलेल्या खरेदीदारांनी बुधवारी एक पाऊल मागे घेत तात्पुरत्या स्वरुपात आडत देण्याची तयारी दर्शविली़ त्यामुळे १७ दिवसांपासून बंद असलेला बाजार समितीतील सौदा गुरुवारी पुन्हा सुरु होणार आहे़ दरम्यान, जिल्हा उपनिबंधकांनी जिल्ह्यातील अकराही बाजार समित्यांना ४० ई प्रमाणे नोटिसा बजावल्या होत्या़कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या शेतीमालाची आडत ही शेतकऱ्यांऐवजी खरेदीदारांकडून घेण्यात यावी, असे राज्य शासनाने आदेश दिले आहेत़ त्यामुळे लातूरसह जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, निलंगा, औसा, चाकूर, औराद शहाजानी, शिरूर अनंतपाळ, देवणी, रेणापूर, जळकोट येथील बाजार समित्यांनी खरेदीदारांना आडत भरण्याच्या सूचना केल्या़ त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांतील खरेदीदारांनी त्यास विरोध दर्शवित ११ जुलैपासून बेमुदत बंद केला होता़ शेतीमाल आणलेल्या शेतकऱ्यांना परत जावे लागत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत होता़ त्यामुळे जिल्हा उपनिबंधक बी़ एल़ वांगे यांनी सर्व बाजार समित्यांच्या सचिवांना ४० ई प्रमाणे नोटिसा बजावल्या़ या नोटीसा बुधवारी सचिवांच्या हाती पडल्यानंतर पुन्हा लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीने आडत, खरेदीदारांची बैठक बुधवारी सायंकाळी घेतली़ यावेळी सभापती ललितभाई शहा, माजी आमदार वैजनाथ भोसले, सचिव मधुकर गुंजकर यांच्यासह बाजार समितीचे सदस्य उपस्थित होते़
नोटिसीनंतर तोडगा निघाला; आजपासून सौदा सुरू होणार
By admin | Published: July 28, 2016 12:36 AM