औरंगाबाद: प्रत्येकाच्या जीवनात एक वाईट काळ असतो. त्याप्रमाणे मीही पक्षाच्या वाईट काळ असताना २०१५ साली राजकारणात आलो. तेव्हापासून मी पक्ष, संघटनेचे काम करीत आहोत. आता पक्षाची साडेसाती संपली असून चांगले दिवस आले आहेत. शिवसेनेत पडलेल्या फुटीचा महाराष्ट्र नवनिर्मान सेनेला लाभ होईल, मनसेच उत्तम पर्याय जनतेसमोर असेल, असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांनी व्यक्त केला.
महासंपर्क अभियानानिमित्त अमित कालपासून औरंगाबादच्या दौऱ्यावर आले आहेत. शुक्रवारी दिवसभर त्यांनी जालना रोडवरील पंचतारांकित हॉटेलमध्ये महाविद्यालयीन युवक,युवतींशी संवाद साधला. दिवसभर झालेल्या या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची महाविद्यालय तेथे शाखा स्थापन केली जाणार आहे. याचेच नियोजन करण्यासाठी महासंपर्क अभियान हा दौरा आहे.
या दौऱ्यात मराठवाड्यातील तरूण, तरूणींचे प्रश्न, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेता आल्या. हे प्रश्न मला मुंबईत बसून कळाले नसते. दोन महिन्यानंतर मी पुन्हा राज्याचा दौरा करणार आहे. राज्यातील राजकीय घडामोडीविषयी त्यांना विचारले असता, मुंबईत दसऱ्याला दोन मेळावे झाल्याचे कळाले. मी ते मेळावे पाहिले नाही ना त्याविषयी काही ऐकले नाही. मात्र शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेन पक्षाकडे अर्थात राज ठाकरे यांच्याकडे जनता उत्तम पर्याय म्हणून पाहू लागली आहे. मनसेची राज्यात सत्ता नसताना भाेंगा आंदोलनाची दखल राज्यातच नव्हे तर परराज्यातही घेतली गेली. मराठी पाटीचा मुद्दा हाती घेतल्यानंतर राज्यात बदल झाल्याचे दिसू लागले. मनसेकडे सत्ता नसताना पक्ष काय करू शकतो, हे जनतेला दिसत आहे. यामुळे मनसे सत्तेत आल्यानंतर अनेक प्रश्न मार्गी लागतील, याची जनतेला खात्री पटत असल्याचे त्यांनी नमूद केले.