लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आगामी सात दिवसांत शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका आणि सीना या दोन्ही नद्यांचा श्वास मोकळा होणार आहे. या मोहिमेमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडून शहर दुर्गंधीमुक्त होण्यास हातभार लागणार आहे. या नद्यांच्या खोलीकरणाचा शुभारंभ भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. कार्यक्रमास पालकमंत्री बबनराव लोणीकर, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, माजी आ. कैलास गोरंट्याल, अरविंद चव्हाण, जि.प. सदस्य राहुल लोणीकर, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक व नागरिक उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही नद्यांमध्ये झालेले अतिक्रमण आणि कचरा साचल्यामुळे दुर्गंधीसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. या दोन्ही नद्यांचे खोलीकरण करुन शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी अतिक्रमण काढण्यासह खोलीकरण आणि स्वच्छता मोहीम राबविण्याचा विचार पुढे आला. त्यानंतर पालकमंत्री लोणीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन यासाठी जिल्हा नियोजन समितीतून अकरा पोकलेन देण्याचे आदेश दिले. तसेच मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिर न्यासाने कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यातून पोकलेनसाठीचा डिझेलचा खर्च भागविला जाणार आहे. कुंडलिका आणि सीना नद्यांच्या खोलीकरणाचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला. अकरा पोकलेनच्या मदतीने नदीचे साडेचार किलोमीटरपर्यंत खोलीकरण करण्यात येणार आहे. आगामी सात दिवसांत हे काम पूर्ण होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी जोंधळे यांनी व्यक्त केला.याप्रसंगी पालकमंत्री लोणीकर, नगराध्यक्षा गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राऊत आदींची भाषणे झाली.
सात दिवसांत कुंडलिका घेणार मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:52 AM