औरंगाबाद : मतदान केंद्रांवर कर्मचारी आणि साहित्याची ने-आण करण्यासाठी सोमवारी तब्बल २२४ बसगाड्या पाठविण्यात आल्या. त्यामुळे जिल्ह्यात दिवसभरात सातशेपेक्षा अधिक फेऱ्या रद्द झाल्या. याचा जिल्ह्यासह औरंगाबादहून विविध शहरांत आणि ग्रामीण भागांत ये-जा करणाऱ्या प्रवाशांना फटका बसला.
औरंगाबाद विधानसभा निवडणुकीसाठी औरंगाबाद विभागातील म्हणजे जिल्ह्यातील विविध आगारांतून २० आणि २१ आॅक्टोबर रोजी २२४ बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे २० आॅक्टोबर रोजी जिल्ह्यातील ७२६ बसच्या फेऱ्या रद्द झाल्या, तर ४७ हजार १२८ कि.मी.चा प्रवास रद्द करण्यात आला. सोमवारीदेखील अशीच परिस्थिती राहिली. ठिकठिकाणाहून नागरिक मतदानासाठी शहरात दाखल झाले होते. मतदानानंतर परतीच्या प्रवासामुळे मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांची चांगलीच गर्दी होती.
मध्यवर्ती बसस्थानकात दुपारी २ वाजेपर्यंत जळगाव, सिल्लोड, धुळे यासह पिशोर, लाडसावंगी, भोकरदन, गणोरी, धामणगाव, म्हैसमाळ, बाबरा आदी ग्रामीण भागांतील ३४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे बसस्थानकासह हर्सूल टी-पॉइंट येथे सिल्लोड, जळगाव आदी मार्गांवरील प्रवासी बसच्या प्रतीक्षेत तासन्तास ताटकळले होते.
मध्यवर्ती बसस्थानकातून प्रवाशांच्या गर्दीने भरून जाणाऱ्या बसगाड्या हर्सूल टी-पॉइंटवर थांबविण्यात येत नव्हत्या. त्यामुळे नाईलाजाने काळीपिवळी वाहनाने प्रवास करण्याची नामुष्की अनेकांवर ओढावली. पंचवटी चौकातही प्रवाशांना बसची नुसती प्रतीक्षा करावी लागली. जिल्ह्यातील इतर आगारांतील रद्द झालेल्या फेऱ्यांचा मंगळवारी आढावा घेण्यात येणार आहे.
बसची व्यवस्था केली : विभाग नियंत्रक अरुण सिया म्हणाले, ‘एसटी’च्या रविवारी ७२७ फेऱ्या रद्द झाल्या. सोमवारीही अशीच परिस्थिती होती. हर्सूल टी-पॉइंटवरील प्रवाशांच्या सुविधेसाठी बसची व्यवस्था केली होती.
बसगाड्यांची परिस्थितीआगार रद्द फेऱ्या रद्द कि.मी.मध्यवर्ती बसस्थानक ८० ६,९६७पैठण ५४ ३,१५३सिल्लोड १३८ ७,९८२वैजापूर २२६ ११,७९५कन्नड ९२ ६,४४३गंगापूर १३६ ९,७८८एकूण ७२६ ४७,१२८