औरंगाबाद : खरीप हंगामातील मागील दोन महिन्यांत मराठवाड्यात ३७.२ टक्के पाऊस पडला आहे. ४१ लाख ८० हजार ८०० हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. पेरणीचा हंगाम संपला असून, अजूनही ७ लाख ३० हजार ९९ हेक्टर क्षेत्र पेरणीविना खाली आहे. हिंगोलीला मागे टाकत बीड जिल्ह्याने मागील पंधरवड्यात ९३.३५ टक्के पेरणी करून अव्वल स्थान मिळविले आहे.
मराठवाड्यात आतापर्यंत ३७.२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक पाऊस ४९.३ टक्के हिंगोली जिल्ह्यात पडला आहे. त्याखालोखाल नांदेड ४४.८ टक्के, लातूर ४०.७ टक्के, परभणी ३५.१ टक्के, उस्मानाबाद ३४.९ टक्के, जालना ३२.८ टक्के, बीड २९.४ टक्के व सर्वात कमी पाऊस औरंगाबाद जिल्ह्यात २५.९ टक्के एवढा झाला आहे. पाऊस चांगला झाल्याने जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात ६३.१५ टक्के पेरण्या झाल्या होत्या. यात ७५.५२ टक्के पेरणी करून हिंगोली जिल्हा आघाडीवर होता, पण चालू पंधरवड्यात बीड जिल्ह्याने हिंगोलीला मागे टाकत ९२.२५ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण केल्या आहेत.
९०.६३ टक्के पेरण्या पूर्ण करून नांदेड जिल्हा नंबर दोनवर राहिला. लातूर ९०.३५ टक्के पेरणी करून तिसऱ्या स्थानी आहे. मागील पंधरवड्यात हिंगोली जिल्ह्यातील पेरणीची गती मंदावल्याने तो ८९.३२ टक्के पेरण्या करून चौथ्या स्थानावर राहिला. त्यापाठोपाठ उस्मानाबाद ८७.८९ टक्के, औरंगाबाद ८५.४१ टक्के, जालना ७९.५५ टक्के, परभणीने ८२.४८ टक्के क्षेत्रावर पेरणी केली. पेरणीत सर्वात मागे परभणी जिल्हा आहे. मराठवाड्यात ४१ लाख ८० हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यात १३ लाख ५३ हजार १०० हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. कपाशीचे एकूण क्षेत्राच्या ३ लाख ६४ हजार ३०० हेक्टर क्षेत्र अजूनही लागवडीपासून खाली आहे. सोयाबीनची पेरणी एकूण क्षेत्रापैकी १६ लाख ८८ हजार ९०० हेक्टरवर (१६२.५६ टक्के) झाली. मराठवाड्यात कपाशीपेक्षा सोयाबीनची पेरणी अधिक झाली आहे. मूग ९५.४५ टक्के, मका ८५.८४ टक्के तर उडदाची पेरणी ८०.६२ टक्के झाली आहे.
...तर दुबार पेरणीचे संकट औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांना आता जोरदार पावसाची आवश्यकता असून, येथील काही तालुक्यांत येत्या आठ दिवसांत पाऊस पडला नाही तर कोरडवाहू शेतीत दुबार पेरणीची वेळ येणार असल्याची माहिती कृषी तज्ज्ञांनी दिली.
कपाशीचे क्षेत्र घटलेमराठवाड्यात १७ लाख १७ हजार ४०० हेक्टरवर कपाशीची लागवड केली जाते. मात्र, मागील वर्षी बोंडअळीच्या उद्रेक आणि यंदा मध्यंतरीच्या काळात पावसाने मारलेली दडी, यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केलीच नाही. त्यामुळे केवळ १३लाख ५३ हजार १०० हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. १५ आॅगस्टपर्यंत बाजरी, तूर, मक्याची मिश्र पेरणी होऊ शकते किंवा शेतकरी रबी ज्वारीची पेरणी करतील.