छत्रपती संभाजीनगर : काँग्रेसच्या पहिल्या यादीत मराठवाड्याचे सात उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. गुरुवारी रात्री ही यादी जाहीर झाली. पहिल्या यादीत जालन्याचे विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांचे नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
फुलंब्रीहून विलास केशवराव औताडे, लातूर शहरातून अमित देशमुख, लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख, हदगावहून माधवराव निवृत्तीराव पवार पाटील, भोकरहून तिरुपती बाबूराव कदम कोंडेकर, पाथ्रीहून सुरेश अंबादास वरपूडकर व नायगावहून मीनल नारायण पाटील खतगावकर ही नावे या यादीत जाहीर झाली आहेत. बहुचर्चित औरंगाबाद पूर्वची काँग्रेसची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही.
फुलंब्रीच्या उमेदवारीबद्दलही प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. तेथे खा. डॉ. कल्याण काळे यांचे बंधू जगन्नाथ काळे व ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. मोहन देशमुख हेही तिकिटासाठी प्रचंड उत्सुक होते. मात्र, पक्षाने विलास औताडे यांना संधी दिली. लातूर शहर व ग्रामीणमधून अनुक्रमे अमित देशमुख व धीरज देशमुख या दोघे बंधूंना पुन्हा संधी मिळाली. गुरुवारीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने ४५ जणांची यादी जाहीर केली. त्यात मराठवाड्यातील दहा उमेदवार आहेत. यापूर्वीच भाजप, शिंदे सेना, राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना उबाठाने आपापल्या याद्या जाहीर केल्या आहेत. उर्वरित याद्या लवकरच जाहीर होतील. कारण २९ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. आणखी पाच दिवसांत सर्वच पक्षांचे चित्र स्पष्ट होईल.
मराठवाड्यात १५ जागांचा तिढामहाविकास आघाडीतील उद्धवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) आणि काँग्रेस पक्षाने ४६ पैकी ३१ जागांवर उमेदवार दिले असून अजून १५ जागांवरील उमेदवार जाहीर होणे बाकी आहे. यात औरंगाबाद पूर्व, गंगापूर, पैठण, परतूर, जालना, बीड, माजलगाव, औसा, निलंगा, उमरगा, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, लोहा, देगलूर, मुखेड आणि हिंगोली मतदारसंघ बाकी आहेत.
एकही मुस्लिम उमेदवार नाहीछत्रपती संभाजीनगर- विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत मराठवाड्यातील सात उमेदवारांचा समावेश आहे. मात्र यात एकही मुस्लिम उमेदवार नाही. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघातून महेबूब शेख यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीत मराठवाड्यातील अजून १५ जागांवरील उमेदवार बाकी आहेत. कदाचित पुढच्या यादीत एखादी जागा मुस्लिम समाजाला दिली जाऊ शकते, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.