छत्रपती संभाजीनगर : वर्षभरानंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मिरवणूक काढून आतषबाजी करणारा कुख्यात गुंड शेख जावेद ऊर्फ टिप्या शेख मकसूद (२९, रा. विजयनगर) याने सेव्हनहिल येथील हॉटेल बंजारामध्ये शेजारी बसलेल्या ग्राहकावर हल्ला करीत लूटमार केली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर टिप्याला जवाहरनगर पोलिसांनी अटक केली होती. कारागृहात असताना टिप्यासह त्याच्या सहकाऱ्यांना मोक्का लावण्यात आल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.
सेव्हनहिल परिसरातील हॉटेल बंजारामध्ये सलमान खान उस्मान खान हे त्यांच्या मित्रासह १ नोव्हेंबर रोजी रात्री ११:३० वाजता बसलेले असताना त्याठिकाणी शेख जावेद ऊर्फ टिप्या याने किरकोळ कारणावरून फिर्यादीच्या डोक्यात तीन वार करून जखमी केले. त्यानंतर टिप्याचे इतर दहा ते बारा सहकारी हातामध्ये लोखंडी कोयता घेऊन आले. त्यांनीही मारहाण केली. त्याचवेळी टिप्याने सलमान खान यांच्या खिशातून ७ हजार रुपये काढून घेतले.
या प्रकरणात टिप्यासह त्याच्या मित्रांच्या विरोधात खून करणे, दरोडा टाकणे, जबरी चाेरी करणे, खुनाचा प्रयत्न करणे आदी कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर आता टोळीप्रमुख शेख जावेद ऊर्फ टिप्या, त्याचे सहकारी ऋषिकेश बाळू काळवणे, सचिन ज्ञानेश्वर दाभाडे, नरेश ऊर्फ झेल्या गणेश पवार, अर्जुन राजू पवार, शेख साहिल शेख युसूफ आणि ज्ञानेश्वर ऊर्फ माउली मनोहर यादव यांच्याविरोधात ‘मोक्कां’तर्गत कारवाई करण्यात आली आहे.
तीन वेळा ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाईशेख जावेद ऊर्फ टिप्या शेख मकसूद याला २०१९, २०२१ आणि २०२३ मध्ये ‘एमपीडीए’अंतर्गत वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याच्या गुन्ह्यांचे प्रमाण अधिक वेगाने वाढते. खंडणी गोळा करणे, दहशत निर्माण करण्याचे गुन्हे टिप्या सतत करीत असतो. सध्या तो हर्सूल कारागृहामध्येच आहे. आता त्याच्याविरोधात मोक्का कारवाई करण्यात आल्यामुळे त्याचा कारागृहातील मुक्काम वाढणार आहे.