लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: मुदखेड तालुक्यातील बारड -भोकरफाटा रस्त्यावर किरकोळ कारणावरुन झालेल्या मारहाणीत राजू पांडुरंग बल्लेवाड यांचा मृत्यू झाला़ या प्रकरणात प्रथमवर्ग न्यायाधीशांनी आरोपी नारायण हुलाजी हुल्लेवाड यास सात वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे़ राजू पांडुरंग बल्लेवाड व त्याचा मावसभाऊ कृष्णा लिंगोजी बिलेवाड हे दोघेजण बारड बसस्थानकासमोर आॅटोची वाट पाहत थांबले होते़ त्यावेळी आरोपी नारायण हुलाजी बल्लेवाड (रा़पांडुर्णा ता़भोकर) त्या ठिकाणी आला़ त्याने राजू बल्लेवाड याला उद्देशून लंगड्या इथे कुठे फिरतोस असे म्हणून हिणविले़ त्यावर राजू बल्लेवाड हे त्याला जाब विचारण्यासाठी जवळ गेले असता, आरोपी नारायण याने राजू याच्या कानशिलात लगावली़ त्यानंतर खाली पडलेल्या राजू याच्या छातीवर बसून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली़ त्यानंतर जखमी राजू घरी गेला़ २० जून रोजी अधिक त्रास होत असल्याने त्याला नांदेड शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ या ठिकाणी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ याप्रकरणी पांडुरंग नारायण बल्लेवाड यांच्या तक्रारीवरुन बारड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता़ या प्रकरणाचा तपास पोनि़ विवेकानंद पाटील यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले़ सरकार पक्षाच्या वतीने १३ साक्षीदार तपासण्यात आले़ प्रमुख जिल्हा न्यायाधीश सविता बारणे यांनी नारायण हुलाजी हुल्लेवाड याला सात वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपयांचा दंड ठोठावला़ सरकारच्या वतीने अॅड़डी़जी़ शिंदे यांनी बाजू मांडली़
खून प्रकरणात सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:12 AM