छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील अनेक तलाठ्यांना एकाच उपविभागात सहा वर्षांचा कालावधी झाला असून, त्यांच्या बदल्या होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ११५ तलाठ्यांच्या बदल्यांची यादी तयार करण्यात आली. त्या यादीला अद्याप विभागीय प्रशासनाने मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे कुणाची कुठे बदली झाली हे समोर आलेले नाही. दरम्यान, बदल्यांच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती अर्जांचा ढीग लागला. शहर व परिसरात अनेक तलाठी मागील सहा वर्षांहून अधिक काळापासून येथेच ठाण मांडून आहेत. उपविभागीय अधिकाऱ्यांकडे बदल्यांचे अधिकार असताना अनेक जण आपल्या सोयीनुसार बदल्या करून घेतात. परंतु, जे तलाठी ग्रामीण भागात कार्यरत आहेत, त्यांना मात्र शहरात येण्याची संधीच मिळाली नाही. सहा वर्षांपर्यंतचा कालावधी एकाच ठिकाणी काढला की, पदोन्नती होऊन पुन्हा त्याच उपविभागात बदली करून घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यातून अनेकांचे लागेबांधे वाढतात. त्यामुळे त्यांना बदली नकोशी वाटते.
इतरांना तीन वर्षांचा नियममहसूलमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून इतरांना तीन वर्षांचा बदलीचा नियम आहे. परंतु, तलाठ्यांना एकाच तालुक्यात सहा वर्षे का ठेवावे, त्यांचीही तीन वर्षांनी बदली का करू नये, असा प्रश्न आहे. अनेक तलाठी कार्यालयात नसतात. हाताखालील कर्मचारीच कामकाज पाहतात. फेर घेण्यास तलाठी टाळाटाळ करतात. १५ ते ३० दिवसांचा नियम असताना, तीन-तीन महिने फेर मंजूर करीत नाहीत. हीदेखील वस्तुस्थिती आहे.
अध्यक्षांचा मेसेज व्हायरलमहसूलमंत्र्यांच्या भेटीचा प्रयत्न केला, मात्र भेट होऊ शकली नाही. तथापि आम्ही इतर मागण्यांसाठी संबंधितांकडे पाठपुरावा केला. तलाठी बदल्यांबाबत सर्व जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस, पदाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना भेटावे. तीन वर्षांच्या आत काळ झालेल्या सजावरून बदली करू नये. तालुक्यात सहा वर्षे झाल्याशिवाय बदली होणार नाही. यासाठी प्रशासनाकडे आग्रही राहून पाठपुरावा करावा. जास्तीत जास्त सभासदांना न्याय मिळवून द्यावा, असा मेसेज राज्य तलाठी महासंघाचे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांच्या नावे सोशल मीडियातून सगळ्या तलाठी संघटनांच्या ग्रुपमध्ये व्हायरल केला.
११५ जणांच्या बदल्या होतीलएकूण पदांच्या ३० टक्के तलाठ्यांच्या बदल्यांची यादी १४ ऑगस्ट रोजी तयार केली. जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम केलेली यादी विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवली आहे. मंजुरी मिळताच लगेच बदलीचे आदेश जारी केले जातील.- विनोद खिरोळकर, निवासी उपजिल्हाधिकारी.