औरंगाबाद : जायकवाडी धरणातून दोन वेगवेगळ्या योजनांद्वारे शहरात पाणी आणण्याचे काम करण्यात येते. मात्र, पाणी वितरणाचे नियोजन कोलमडले आहे. शहरातील विविध वसाहतींना पाचव्या दिवशी नियमितपणे पाणी देण्यात येते. सिडको-हडकोतील अनेक वसाहतींना नऊ दिवस झाले तरीही पाणी मिळालेले नाही. एन - २ भागातील नागरिकांना शुक्रवारी नवव्या दिवशी पाणी मिळाले नाही. या संदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून वेगवेगळी उत्तरे देण्यात येत आहेत.
दरवर्षी उन्हाळ्यात सिडको-हडकोतील पाणीप्रश्न गंभीर बनतो. गतवर्षी कडक लॉकडाऊन असतानाही नागरिकांनी पाणी प्रश्नावर ओरड केली नाही. यंदाही एप्रिलपासून पाणीप्रश्न गंभीर बनत आहे. सिडको-हडकोसह चिकलठाणापर्यंत नवव्या दिवशी तर कधी दहाव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येतो. नक्षत्रवाडी येथून सिडको-हडकोसाठी स्वतंत्र एक्सप्रेस लाईन टाकण्यात आलेली आहे. सिडको एन - ५ आणि एन - ७ येथील पाण्याच्या टाक्यांवरून वितरण व्यवस्था करण्यात येते. सिडको एन - २ भागात शुक्रवारी नऊ दिवसांनंतरही नागरिकांना पाणी मिळाले नव्हते. दरम्यान, या संदर्भात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता के. एम. फालक यांनी सांगितले की, काही दिवसांपासून सिडको-हडकोतील वितरण व्यवस्था मागे-पुढे होत आहे. पाचव्या किंवा सहाव्या दिवशी प्रत्येक वसाहतीला पाणी देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. चिकलठाण्यापर्यंत काही वसाहतींना उशिराने पाणी देण्यात येत आहे.
कंत्राटदाराच्या टँकरकडे दुर्लक्ष
महापालिकेने २००पेक्षा अधिक वसाहतींना पाणी देण्यासाठी खासगी कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. ८५ ते ९० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. टँकरचालक हे पाणी नेमके कुठे नेऊन देत आहेत, हे पाहण्यासाठी महापालिकेकडे कोणतीही यंत्रणा नाही.