चिंचोली लिंबाजी : कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजीसह ४० गावांचा जलस्रोत म्हणून ओळख असलेल्या नेवपूर येथील पूर्णा-नेवपूर मध्यम प्रकल्प १०० टक्के भरल्याने ओसंडून वाहत आहे. वडोद लघू प्रकल्प ६० टक्के तर गणेशपूर लघू सिंचन प्रकल्पात ७० टक्के पाणीसाठा झाल्याची माहिती प्रकल्प शाखा अभियंता जी. बी. ताजी यांनी दिली.
यंदा सुरुवातीपासून चिंचोली लिंबाजीसह प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने पाऊस होत असल्याने २३ ऑगस्टला प्रकल्प ८० टक्के भरला होता. त्यानंतरही परिसरात अधूनमधून दमदार पाऊस होत होता. २७ ऑगस्टच्या रात्री परिसरात अतिवृष्टी झाल्याने प्रकल्प ओसंडून वाहू लागला आहे. तालुक्याची वार्षिक सरासरी ६७२.७२ मि.मी. आहे. गुरुवारी सकाळपर्यंत चिंचोली लिंबाजी महसूल मंडळात ८२३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणात ९.३४ दलघमी जिवंत साठा असून ११.८७७ दशलक्ष घनमीटर एकूण जलसाठा झाला आहे. यामुळे रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध झाले असून या प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्याखालील १ हजार ९६० हेक्टर शेतीला सिंचनासाठी याचा लाभ होणार आहे.
चौकट...
वर्षभराचा पाणीप्रश्न मिटला
पूर्णा-नेवपूर प्रकल्प भरल्यानंतर चिंचोली लिंबाजीसह, परिसरातील वीस गावांचा पुढील एक वर्षाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. चिंचोली लिंबाजी, नेवपूर, वाकी, घाटशेंद्रा, टाकळी अंतुर, लोहगाव, गणेशपूर, बरकतपूर या गावांतील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पाणी मिळणार असल्याने आनंदाचे वातावरण आहे.
फोटो : कन्नड तालुक्यातील पूर्णा-नेवपूर मध्यम प्रकल्प १०० टक्के भरल्याने सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे. (छाया : प्रशांत सोळुंके)
020921\20210902_141149.jpg
कन्नड तालुक्यातील पूर्णा-नेवपूर मध्यम प्रकल्प १००% भरल्याने सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे....छाया प्रशांत सोळुंके