छत्रपती संभाजीनगर : सावंगी परिसरातील न्यू बिगिनिंग इंटरनॅशनल स्कूलमधील शिक्षकानेच वर्षभर एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकारामध्ये इतरही दोन शिक्षक सहभागी असून, त्यांच्यासह संस्थाचालकाच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याच्या मागणीसाठी पालकांसह नागरिकांनी नायगाव फाट्याजवळ रास्ता रोको करीत शाळेसमोर जोरदार निदर्शने केली.
न्यू बिगिनिंग इंटरनॅशनल स्कूलमधील क्रीडा शिक्षक सय्यद अबू नासर सय्यद (वय ३६, रा. छत्रपती संभाजीनगर) हा फुटबॉल शिकवीत होता. त्याने शाळेतील १४ वर्षीय पीडित विद्यार्थिनीला क्रीडा विभागाच्या खोलीत वारंवार बोलावून घेत तिचे लैंगिक शोषण केले. त्याचे फोटोही काढून व्हायरल करण्याची धमकी देत होता. हा प्रकार ६ जानेवारी ते १५ नोव्हेंबर २०२४ या काळात घडला. शिक्षकाच्या या त्रासाला कंटाळून पीडित विद्यार्थिनीने आई-वडिलांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी पीडितेला घेऊन २० जानेवारी रोजी फुलंब्री पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून पॉस्कोसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी शिक्षक नासरला अटक केली. तो सध्या हर्सूल कारागृहात आहे. दरम्यान, नासरसह त्याचे दोन सहकारी आणि संस्थाचालकाच्या विरोधात गुन्हा नोंदवून अटक करावी, शाळा प्रशासनाबद्दल पालकांच्या अनेक तक्रारी आहेत. त्यावर शिक्षण विभागाने कारवाई करावी या मागण्यांसाठी संतप्त पालकांनी शुक्रवारी दुपारी शाळेसमोर निदर्शने केली. त्यानंतर नायगाव फाट्याजवळ रास्ता रोकोही केला.
लोकप्रतिनिधीसह अधिकाऱ्यांची धावशाळेत आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आ. अनुराधा चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा नागरे, पोलिस निरीक्षक संजय सहाने व इतरांनी धाव घेतली. कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
इतरही विद्यार्थिनींचे शोषण का?शाळेतील एका विद्यार्थिनीचे शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर इतरही काही विद्यार्थिनींचे शोषण करण्यात आल्याची चर्चा आंदोलनस्थळी करण्यात येत होती. मात्र, सायंकाळपर्यंत एकाही विद्यार्थिनीसह पालकांनी तक्रार किंवा पोलिसात जवाब देण्यासाठी पुढे आले नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.
न घाबरता समोर यावेशाळा किंवा शाळेतील कोणाही विषयी तक्रार असल्यास पालकांनी न घाबरता समोर यावे. त्यात पारदर्शकपणे तपास होईल. कोणाचीही गय केली जाणार नाही. प्रकरणाशी संबंधित प्रत्येकाची कसून चौकशी सुरू आहे. कोणी दोषी आढळल्यास निश्चित आरोपी होतील. शिवाय आम्ही या प्रकरणासह निष्पन्न होणाऱ्या तथ्यांचा एक अहवाल शिक्षण विभागाला देखील पाठवणार आहोत.- डॉ. विनयकुमार राठोड, पोलिस अधीक्षक.