लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शैक्षणिक वर्ष संपल्यानंतरही जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना २०१६-१७ मधील शिष्यवृत्ती अद्याप मिळाली नाही़ त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांची कुचंबणा होत असून आर्थिक आधाराविना अनेकांना शिक्षण घेणे शक्य होत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे़ मागील वर्षीची शिष्यवृत्ती त्वरित अदा करावी, या मागणीसाठी एसएफआय विद्यार्थी संघटनेच्या वतीने बुधवारी समाजकल्याण अधिकारी कार्यालयापुढे निदर्शने करण्यात आली़भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाकडून मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्ष २०१६-१७ संपत असतानासुद्धा शासनाने आजतागायत विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा केलेली नाही. आरक्षण, वसतिगृह अणि शिष्यवृत्ती यासारख्या उपाययोजनांमुळे उपरोक्त प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत व्हावी, यासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष संपूनसुद्धा शिष्यवृत्ती जमा न होणे, विद्यार्थ्याच्या परीक्षा शुल्काची रक्कम विद्यार्थ्यांकडूनच वसूल करणे असे प्रकार सुरू आहेत़ या विरोधात १९ जुलै रोजी स्टुडंटस आॅफ फेडरेशन (एसएफआय) कडून समाजकल्याण कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम जमा न होण्याचे कारण समाजकल्याण विभागाकडून संकेतस्थळ उपलब्ध नसल्याचे दिले जात आहे़ आंदोलनात बालाजी कलेटवाड, सचिन खडके, मंजुश्री कबाडे, जिल्हाध्यक्ष विकास वाठोरे, शहराध्यक्ष विनोद भद्रे, शहर सचिव विठ्ठल यलगंधेवाड, मीना आरसे, सुमेध सदावर्ते, अजय गायकवाड, शिवाजी पारधे, सिद्धेश्वर मोरे, शिवप्रसाद धनवडे, माधव धर्मेकर, शेख तयब, दिगंबर गुडलवाड, अक्षय कांबळे, मालेमा आरसे, स्वप्निल बुक्तरे, अमोल भोरगे, सुभाष कांबळे, विजय हनवते, भास्कर गच्चे आदींचा सहभाग होता़
शिष्यवृत्तीच्या मागणीसाठी एसएफआयची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:16 AM