औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी एसएफआय संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा ते प्रशासकीय इमारती दरम्यान मोर्चा काढला. यावेळी विद्यार्थ्यांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.
विद्यापीठातील विविध विभागांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहांमध्ये पिण्याचे पाणी, सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा, कमवा व शिका योजनेच्या मानधनात वाढ अशा पायाभुत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. प्रशासकीय इमारतीसमोर मोर्चा पोहचल्यानंतर एसएफआयच्या पदाधिकाऱ्यांनी मागण्या मान्य करण्यासाठी घोषणाबाजी करत उपस्थितांना मार्गदर्शन केले. विद्यापीठाच्या परिसरात शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोेंड द्यावे लागत आहे. वसतिगृहातील सुविधा, आरोग्य आदी बाबतीत प्रशासन उदासीन असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी प्रशासकीय इमारतीबाहेर येत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला पाहिजे, त्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले.
त्यानंतर प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. मुस्तजिब खान यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य असून, येत्या आठ दिवसात सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे स्पष्ट केले. दोन्ही अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर एसएफआयच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन पाठिमागे घेतले. मात्र त्याचवेळी सात दिवसात विद्यापीठ प्रशासनाने कार्यवाही न केल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही कुलसिचव डॉ. पांडे यांच्याशी चर्चा करताना पदाधिकाऱ्यांनी दिला.
या आंदोलनात एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव, सहसचिव नितिन वाव्हळे, जिल्हाध्यक्ष लोकेश कांबळे, सचिव स्टॅलिन आडे, सत्यजित म्हस्के, समाधान बारगळ, रवी खंदारे, मोनाली अवसरमल, भाग्यश्री मरळकर, ओंकार पाटील, प्रमोद घुगे आदी उपस्थित होते.