औरंगाबाद : दहशत, मस्ती, शान दाखविण्यासाठी गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या रिक्षाचालकास क्रांतिचौक पोलिसांच्या विशेष पथकाने बेड्या ठोकल्याची कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आहेत. आरोपी आवेज अस्लम कुरेशी (२२, रा. सिल्लेखाना) यास अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांनी दिली.
क्रांतिचौक पोलीस ठाण्यातील विशेष पथकाचे उपनिरीक्षक विकास खटके हे हद्दीमध्ये पथकासह गस्त घालत असताना त्यांना एक रिक्षाचालक समतानगर येथे गावठी कट्टा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार उपनिरीक्षक खटके, सहायक फौजदार नसीम पठाण, हवालदार संतोष मुदीराज, नरेंद्र गुजर, इरफान खान, भाऊलाल चव्हाण, संतोष सूर्यवंशी, हनुमंत चाळणेवाड यांच्या पथकाने सापळा रचला. या सापळ्यात अलगतपणे आवेज कुरेशी अडकला. पोलीस असल्याची चाहूल लागताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकातील पोलिसांनी त्याला झडप मारून पकडले. पकडल्यानंतर त्याची अंगझडती घेतल्यावर त्याच्या कंबरेला गावठी कट्टा मिळून आला. या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला असून, अधिक तपास सहायक निरीक्षक डॉ. विशाल इंगळे करत आहेत.
आरोपी रिक्षाचालक, दहावी पासआरोपी आवेज कुरेशी हा दहावी पास असून, रिक्षा चालविण्याचे काम करतो. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक सरकारी वकील दत्तात्रय काठुळे यांनी आरोपीने गावठी कट्टा कोठून व कोणाकडून घेतला. कट्टा बाळगण्याचा नेमका उद्देश काय होता, गावठी कट्ट्यात काडतूस होते काय, याचा आणि आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत, यासंबंधीचा तपास बाकी असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. न्यायालयाने विनंती मान्य करून आरोपीला १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.