औरंगाबाद : एन २ परिसरातील मनपा शाळेच्या मोकळ्या मैदानातून पायी चालत जात असलेल्या विद्यार्थ्यास दोन जणांनी लुटत गळ्यातील सोन्याची साखळी आणि महागडा मोबाईल हिसकावुन पळ काढला होता. ही घटना १४ सप्टेंबरच्या रात्री ८ वाजता घडली. विद्यार्थ्यांस लुटणाऱ्या आरोपीला मुकुंदवाडी पोलिसांनी बेड्या ठोकत त्याच्याकडून लुटलेला मुद्देमाल जप्त केल्याची माहिती निरीक्षक ब्रम्हा गिरी यांनी दिली.
शहरात शिक्षण घेण्यासाठी आलेला सिद्धेश चंद्रकांत डिटी (रा. परभणी, ह.मु. भाेईवाडा) हा १४ सप्टेंबरच्या रात्री एन २ येथील तुकोबानगर भागात असलेल्या मनपा शाळेच्या मोकळ्या मैदानातून रात्री आठ वाजता चालत जात होता. तेव्हा त्यास झाडाच्या आड दडून बसलेल्या अनोळखी युवकाने जिवे मारण्याची धमकी देत त्याच्या गळ्यातील सहा ग्रॅमची सोन्याची साखळी आणि आयफोन काढुन घेतला. या घटनेमुळे घाबरलेल्या युवकाने थेट रुम गाठली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुकुंदवाडी ठाण्यात येत गुन्हा नोंदवला.
मुकुंदवाडीच्या विशेष पथकाचे बाळासाहेब आहेर यांना रेल्वे गेट नंबर ५६ जवळील पानटपरीवर एक युवक मोबाईल व सोन्याची साखळी विक्रीसाठी आल्याची माहिती मिळाली. तो आई दवाखान्यात ॲडमिट असून, तिच्या उपचारासाठी पैशाची गरज असल्यामुळे विकत असल्याचेही सांगत होता. तेव्हा उपनिरीक्षक आहेर, हवालदार संतोष भानुसे, मनोहर गिते, नरसिंग पवार, बाळासाहेब कांबळे अनिल थोरे, गणेश वाघ व शाम आढे यांच्या पथकाने छापा मारुन तरुणास पकडले. तेव्हा त्याने वैभव बाळासाहेब शिंदे (२२, रा. महालक्ष्मी कॉलनी, एन २, ठाकरेनगर) असे नाव सांगितले. त्यांच्याकडे विद्यार्थ्याची लुटलेली सोन्याची चैन, मोबाईल सापडला. त्यास पकडून आणत अटक करण्यात आली. ही कामगिरी निरीक्षक ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.