औरंगाबाद : जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये बुधवारी भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. त्यात नाशिकचे स्क्वॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे (३३) हे शहीद झाले. निनाद हे शहरातील शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी होते. तसेच त्यांनी येथील सैनिकीपूर्व प्रशिक्षण संस्थेतूनसुद्धा सैनिकी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला होता.
निनाद यांचा लहानपणापासूनच सैन्यात जाण्याकडे कल होता. यामुळेच त्यांनी शालेय शिक्षण भोसला मिलिटरी स्कूलमध्ये घेतले. त्यानंतर त्यांनी औरंगाबाद गाठले. येथे त्यांनी सैनिकीपूर्व प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतला. ते २००३-०५ या काळातील २६ व्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी होते. याच दरम्यान त्यांचे विज्ञान शाखेतील अकरावी, बारावीचे शिक्षण शासकीय ज्ञान- विज्ञान महाविद्यालयात सुरू होते. या काळात प्रशिक्षण केंद्र ते शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयात ते सायकलवरून जाणे-येणे करीत असत.
एसपीआय संस्थेत असताना निनादचे शारीरिक शिक्षक असलेले बाबासाहेब नलावडे यांनी सांगितले की, स्वभावाने अत्यंत मनमिळाऊ असलेला निनाद खूप मेहनती व प्रामाणिक होता. येथे विद्यार्थ्यांच्या देवगिरी विभागात असताना त्याने हॉकी आणि धावण्याच्या स्पर्धेत विशेष रस दाखविला. तो या दोन्ही क्रीडा प्रकारात उत्कृष्ट खेळाडू होता. धावण्याच्या स्पर्धेत तो नेहमी अव्वल येत असे. एनडीएमध्ये प्रवेश करण्याचा त्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला होता. त्यामुळे त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर एनडीएमध्ये प्रवेश मिळविला.
हैदराबादमध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यावर २५ डिसेंबर २००९ मध्ये भारतीय हवाई दलाच्या सेवेत दाखल झाला. २४ डिसेंबर २०१५ मध्ये त्यांची निवड स्क्वॉड्रन लीडरपदी झाली. गुवाहाटी, गोरखपूरमधील सेवा झाल्यावर त्यांची श्रीनगरमध्ये नेमणूक झाली होती. जेव्हा निनाद हे शहीद झाल्याची बातमी संस्थेत कळली तेव्हा येथे शोककळा पसरली. येथील सर्व प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
संस्थेत सैनिकीपूर्व प्रशिक्षण घेतानाच निनादने वायुदलात जाण्याची इच्छा अनेकदा व्यक्त केली होती. त्यादृष्टीने त्याचे प्रयत्न सुरू होते. येथील शिक्षकांनीही त्याला यादृष्टीने मार्गदर्शन केले होते. - संजय काळोखे, तत्कालीन वार्डन, सैनिकीपूर्व प्रशिक्षण संस्था