औरंगाबाद : हिंदी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार अभिनेता शाहरुख खान याच्या आगामी ‘जवान’ या सिनेमाचे चित्रीकरण (शूटिंग) बिडकीन येथील ‘डीएमआयसी’त होणार असून चित्रिकरणासाठी लागणारी सर्व यंत्रणा बिडकीन येथे पोहोचली आहे. चित्रपटातील काही साहसी दृष्यांचे (ॲक्शन सीन) येथे चित्रीकरण होणार असल्याची माहिती आहे.
अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ हा एक ॲक्शनपट असून जून २०२३ मध्ये तो रिलीज होणार आहे. सध्या हा सिनेमा सध्या निर्मिती प्रक्रियेत असून पुणे, हैदराबाद, मुंबई, चेन्नई येथे शूटिंग होणार आहे. मात्र, चित्रपटातील भरधाव गाड्यांचा थरार शूट करण्यासाठी या मेट्रो शहरात जागा नसल्याने औरंगाबाद नजीकच्या बिडकीनची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून शाहरुख खानच्या ‘रेड चिली प्रॉडक्शन’चे अधिकारी प्रयत्नशील होते. अखेर त्यांना चित्रिकरणासाठी परवानगी मिळाली असून सर्व यंत्रणा चित्रीकरणस्थळी पोहोचली आहे.
शाहरुख येणार की नाही?या शूटिंगसाठी शाहरुख खान येणार का, याबाबत साशंकता आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ‘बॉडी डबल’च्या माध्यमातून ॲक्शन सीनचे शूटिंग करण्यात येणार असल्याचे समजते. परदेशातील काही ॲक्शन कलाकारही यात सहभागी होणार आहेत.
बघ्यांची तोबा गर्दी!शाहरुख खानच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू होत असल्याची माहिती मिळताच बिडकीन येथे बघ्यांनी एकच गर्दी केली. मात्र, अद्याप शूटिंग सुरू नसल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला. गर्दीला आवर घालण्यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शूटिंग खूप आतमध्ये असल्याने डीएमआसीतील सर्व अंतर्गत रस्ते बंद करण्यात आले आहेत.
समंथाऐवजी नयनतारा!‘जवान’चे दिग्दर्शन अरुण कुमार उर्फ ॲटली हे करणार असून या चित्रपटात समंथा प्रभू ही प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री काम करणार होती. मात्र, तिच्याऐवजी नयनतारा या अभिनेत्रीला संधी मिळाली आहे. तिचा हा पहिला हिंदी सिनेमा असेल. या शिवाय, प्रियामणी, सुनील ग्रोवर, सान्या मल्होत्रा आणि योगी बापू हे कलाकार असणार आहेत. तसेच फ्लॅशबॅकमध्ये दीपिका पदुकोण हिचा कॅमिओ असेल. अनिरुद्ध रविचंद्र हे दाक्षिणात्य संगीतकार या सिनेमाला संगीत देणार आहेत.