औरंगाबाद : राजर्षी शाहू महाराज हे पारंपरिक राजाच्या कल्पनेत बसत नाहीत. ते थोर माणूस आहेत. हा माणूस सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत पोचून स्वतःला त्यांच्यामध्ये विरघळून टाकतो. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे अनेक पदरी, अनेक पैलू असणारे होते. त्यांच्यामध्ये अनेक ऊर्जा केंद्र होती. या कर्तृत्वाचे वाचन, पुनर्वाचन होणे गरजेचे आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे व्यामिश्र असल्यामुळे या राजाचा शोध घेताना हजार वाटांनी जावे लागते तरच किंचित काही प्रमाणात हा राजा समजून घेता येतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राजर्षी शाहू महाराज अध्यासन केंद्रातर्फे शाहू महाराज जयंतीनिमित्त शनिवारी (दि.२६) ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकुलगुरू प्रा. शाम शिरसाट होते. याप्रसंगी कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी, संयोजक डॉ.कैलास अंभुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 'मी राजा शोधतोय' या विषयावर बोलताना प्रा राजन गवस म्हणाले, राजर्षी शाहूंचे व्यक्तिमत्व विविधांगी पैलूंचे होते. ते जंगलवेडे, पशुपक्ष्यांवर नितांत प्रेम करणारे होते हे दाजीपूरचे जंगल पाहिल्यावर लक्षात येते. शिकारीचा छंद असणारे असेच त्यांचे चित्र रंगवले गेले; परंतु एक राजा झाडांच्या प्रेमात असणे ही विलक्षण गोष्ट आहे. ते जेव्हा अन्य कुठे जात असत त्या ठिकाणाहून नाविन्यपूर्ण वृक्ष आणून त्यांनी जंगल समृद्ध केले. त्यांनी या परिसरात खैराची झाड वाढवली. खैराच्या शेतीचा प्रयोग केला. शेतकऱ्यांना उद्यमशील बनवण्यासाठी काथ कारखाना काढला. त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू शेतकरी होता. त्यांनी हवामानानुसार पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त केले. सोबतच त्यांचा भुदरगड राधानगरीच्या सर्वसामान्य माणसांची संपर्क होता. महाराज स्थापत्य, शिल्प, चित्रकला, संगीतप्रेमी होते. त्यांच्या कणखर बहुआयामी व परिवर्तनशील दृष्टीमुळे त्यांची काम सुरू असताना काही कल्पित कथा रचून लोकांमध्ये पसरविण्याची यंत्रणा विरोधातल्या लोकांनी निर्माण केली होती असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोप करताना प्रा. श्याम शिरसाठ म्हणाले, राजर्षींसारखे बहुआयामी व्यक्तिमत्व भारताच्या इतिहासात अपवादात्मक आहे. एखादे धोरण पूर्ण करण्यासाठी योजना त्यांच्याकडे होती. वर्तमान काळातील, समाजातील सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्याचा एकमेव मार्ग हा 'शाहू मार्ग' आहे. या कार्यक्रमासाठी राज्यभरातील श्रोत्यांसह व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. राजेश करपे, प्रा रणधीर शिंदे, साहित्यिक बाबा भांड, एकनाथ पगार, प्राचार्य गजानन जाधव, प्रा.स्मिता अवचार, ललिता गादगे, पद्मरेखा धनकर, डॉ.दासू वैद्य आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय अध्यासन केंद्राचे संचालक डॉ कैलास अंभुरे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा पुरुषोत्तम देशमुख यांनी केले.
साठनंतरच्या काळात शाहू विचार केंद्रस्थानीराजर्षी शाहू महाराजांचा विचार हा साठच्या दशकानंतर मध्यवर्ती आला. याचे श्रेय दलित चळवळीला जाते. दलित साहित्य व चळवळीने फुले-शाहू- आंबेडकरांचा विचार केंद्रस्थानी आणला आणि पुढील काळात या त्रयींचा इतरांनी गांभीर्याने विचार केला, असेही गवस म्हणाले.