औरंगाबाद : 'शरद पवार तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है', 'मोदी सरकार हाय-हाय ' अशी जोरदार घोषणाबाजी करत शरद पवार यांच्यावरील 'इडी'कडून दाखल गुन्ह्याचा निषेध राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे करण्यात आला.
राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अनियमित कर्जवाटप प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सुमारे 70 जणांवर मंगळवारी 'ईडी'तर्फे गुन्हा दाखल करण्यात आला. याचा निषेध म्हणून शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे बुधवारी (दि.२५ ) सकाळी क्रांती चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे शुक्रवारी (दि.२७) महाराष्ट्र बंदचे आवाहन केले असून यात सर्व मित्र पक्ष आणि नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तसेच शहराध्यक्ष विजय साळवे यांनी पक्षाचा सर्व कार्यकर्ते शरद पवार यांच्यासोबत असून सरकारला त्यांची जागा दाखवून देतील, त्यांच्यावरील गुन्हे तत्काळ मागे घ्यावीत अशी मागणी केली.