औरंगाबाद - गेली अनेक वर्ष औरंगाबादच्या राजकारणावर एकहाती पकड ठेवणारे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांना पुढची लोकसभेची निवडणूक कठीण जाऊ शकते. कारण पुढच्या निवडणुकीत खैरे यांच्यासमोर महामंडलेश्वर शांतिगिरी महाराजांचे आव्हान असणार आहे. भक्तांच्या इच्छेखातर आपण पुढची लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे शांतिगिरी महाराजांनी म्हटले आहे.
वेरुळच्या जनार्दन स्वामी मठाचे प्रमुख महामंडलेश्वर शांतिगिरी महाराजांचा औरंगाबादमध्ये मोठा भक्त परिवार आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशात शांतिगिरी महाराजांना मानणारे लाखो अनुयायी आहेत. त्यामुळे पुढची निवडणूक खैरे यांच्यासाठी सोपी असणार नाही. शिवसेना आणि भाजपामध्ये आता सलोख्याचे संबंध राहिलेले नाहीत.
दोन्ही पक्षांची स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी सुरु आहे. त्यासाठी दोन्ही बाजूंकडून विविध मतदारसंघात सक्षम उमेदवारांचा शोध सुरु आहे. शांतिगिरी महाराजांच्या रुपाने भाजपाकडे एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजपाकडून संधी मिळू शकते. अन्यथा ते अपक्ष निवडणूक रिंगणात उतरतील. 2009 साली शांतिगिरी महाराजांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. पण अपक्ष लढूनही त्यांना 1 लाख 48 हजार 26 मते मिळाली होती.