डॉ. शरद अदवंत यांच्याशी माझे लहानपणापासून कौटुंबिक संबंध होते. माझ्या वडिलांचे ते अतिशय जवळचे मित्र होते. स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्था व मराठवाडा जनता परिषदेत काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी अनेकदा गोविंदभाईंसोबत केलेल्या कामाचा अनुभव आम्हाला सांगितला. त्यामुळे आमचा काम करण्याचा उत्साह वाढायचा. स्वामी रामानंद तीर्थ संस्थेत वेगवेगळ्या संशोधन प्रकल्पांना मान्यता मिळावी व ते पुढे जावे यासाठी ते सतत आम्हाला मार्दर्शन करायचे. त्यांच्या जाण्याने अनेक संस्थांमधील पुरोगामी चेहरा व आमचे मार्गदर्शक गमावले आहेत.
- डॉ. रश्मी बोरीकर
सरांसारखे कार्यकर्ते मिळणे अशक्य
अदवंत सर सरस्वती भुवन सायन्स कॉलेजला, तर मी आर्टस आणि कॉमर्स कॉलेजला प्राचार्य होतो. आम्ही ३०-४० वर्षे एकत्र काम केले. अगोदर गोविंदभाईंच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक संस्थेत व नंतर मराठवाडा जनता परिषद तसेच स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेत आम्ही सोबत काम केले. अदवंत सर हे दोन्ही संस्थांचे सरचिटणीस राहिलेले आहेत. मीही या संस्थेच्या कार्यकारिणीवर असल्यामुळे आमचे खूप चांगले संबंध होते. त्यांच्या जाण्याची बातमी समजली आणि मला मोठा धक्का बसला. जणूकाही कुटुंबातला सदस्य गेल्याचे दु:ख झाले. त्यांच्यासारखे तळमळीचे कार्यकर्ते मिळणे अशक्य आहे.
- प्राचार्य डॉ. जीवन देसाई
मराठवाड्याची मोठी हानी
असोसिएशन ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी सुपर ॲन्युएटेड टीचर्स (एसीयूएसएटी) या संघटनेचे संस्थापक सदस्य, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रांतील अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि मराठवाडा विकासाच्या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे माझे स्नेही प्राचार्य डॉ. शरद अदवंत यांच्या निधनाने मोठा धक्का बसला. शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक वर्षे आम्ही सोबत काम केले आहे. त्यांच्या जाण्याने मराठवाड्याची मोठी हानी झाली. ‘एसीयूएसएटी’च्या वतीने आणि माझ्या परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
डॉ. एम. ए. वाहूळ