लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर :राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात घेण्यास कार्यकर्त्यांनी शनिवारी स्पष्ट विरोध केला. कार्यकर्त्यांच्या भावना ओळखून ‘एखाद्या नासक्या आंब्यामुळे मी संपूर्ण अडी खराब होऊ देणार नाही, काळजी करू नका’, अशा शब्दांत शरद पवार यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली.
शरद पवार गटाचा मेळावा शनिवारी राष्ट्रवादी भवनात मेळावा झाला. या मेळाव्यात शरद पवार यांचे भाषण सुरू असताना समोरच बसलेल्या एका कार्यकर्त्याने आमदार चव्हाण यांचे नाव घेऊन ‘सतीश चव्हाण यांना पक्षात घेऊ नका’ असे जोरदारपणे सांगितले. त्यानंतर उपस्थित इतर कार्यकर्त्यांनीही आमदार चव्हाण यांचे नाव घेऊन त्यांना परत पक्षात घेऊ नका, अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर शरद पवार बोलायला उभे राहिल्यानंतर ‘एखाद्या नासक्या आंब्यामुळे मी संपूर्ण अडी खराब होऊ देणार नाही, काळजी करू नका, अशा शब्दांत कार्यकर्त्यांना आश्वस्त केले.
सतीश चव्हाण इच्छुक
आमदार सतीश चव्हाण हे सध्या विधान परिषदेचे सदस्य आहेत. ते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गंगापूर मतदारसंघातून इच्छुक आहेत. तिथे त्यांची जोरदार तयारी सुरू आहे. तिथे विद्यमान आमदार भाजपचा आहे. महायुतीमध्ये ती जागा भाजपच्या वाट्याला जाऊ शकते. त्यामुळे सतीश चव्हाण हे अपक्ष किंवा शरद पवार गटाकडून उभे राहण्याची तयारी करत आहेत.