औरंगाबाद- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील राजकीय परिस्थितीवर सूचक विधान केले. 'राज्यात मध्यावधी निवडणुका होतील, असं म्हणालोच नव्हतो', असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले. तसेच, 'येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून लढावे, अशी माझी इच्छा आहे', असे सूचक विधानही त्यांनी केले.
'जे गेले ते...'राज्यातील राजकीय परिस्थितीवर पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, 'विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणून सामोरं जाऊ अशी इच्छा होती, पण तशी चर्चा झाली नागी. आमच्या पक्षात काही झाले नाही, जे गेलेत ते दुसरीकडचे गेले आहेत. 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या काही लोकांनी त्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न केला होता, पण मी त्यांना जाऊ दिलं नाही,' असं पवार म्हणाले.
'मविआ म्हणून लढावं'यावेळी शरद पवार यांनी महाविकास आघाडीबद्दलही मोठे विधान केले. 'सरकार कोसळल्यानंतर महाविकास आघाडीचे काय होणार असे प्रश्न उपस्थित होत आहेत. पण, पुढील काळात येणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढाव्यात अशी आपली इच्छा आहे. मात्र हे निर्णय बसून चर्चेतून घ्यावे लागतील, याबाबत आमच्या तीन पक्षांची चर्चा झालेली नाही,' असंही त्यांनी नमूद केलं.
'ते मी बोललोच नाही'ते पुढे म्हणाले की, 'पुढील निवडणुकीसाठी अडीच वर्षांचा कालावधी आहे. कोणतीही निवडणूक असली की, सहा महिन्यांचा कालावधी मिळतो. त्या अनुशंगाने पक्षातील नेत्यांना निवडणुकीसाठी तयारी लागण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु, आपण मध्यावधी निवडणूक होईल असं म्हणालो नव्हतो,' असंही पवारांनी सांगितलं.