औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक एमजीएम परिसरातील प्रियदर्शिनी उद्यानात उभारणे प्रस्तावित आहे. त्या स्मारकाच्या कामाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत.
एमजीएम विद्यापीठात आयोजित कार्यक्रमासाठी पवार शहरात आले होते. एमजीएम परिसरात शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारण्यात येणार आहे, त्यासाठी वृक्षतोड होत असल्याकडे एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम यांनी भाषणात लक्ष वेधले होते, तो धागा पकडून पवार म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरे आणि माझे ऋणानुबंध होते. त्यांचे स्मारक होत असेल तर ती चांगली गोष्ट आहे; पण झाडे तोडून स्मारक होत असेल, तर ते बरोबर नाही. बाळासाहेब ठाकरे हयात असते, तर त्यांनी झाडे तोडणाऱ्यांना फटके लगावले असते. त्यापेक्षा त्यांच्या स्मारकाचे काम एमजीएमवरच सोपवा, अशी सूचना पवार यांनी यावेळी केली.
पवारांच्या या सूचनेमुळे शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आणि महापौर नंदकुमार घोडेले चक्रावून गेले. गेल्या काही दिवसांपासून बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक निर्माण करण्याच्या कामात भाजपसह काही यंत्रणा अडथळे आणत असल्याची शिवसेनेचे भावना आहेत. या पार्श्वभूमीवर खैरे आणि घोडेले यांनी पवार यांच्याशी एका हॉटेलात चर्चा केली. यावेळी आ. सतीश चव्हाण यांची उपस्थिती होती. एमजीएमकडे स्मारकाचे काम सोपवायचे असेल तर त्यासंदर्भात पवारांनीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करावी, असे मत खैरे आणि घोडेले यांनी व्यक्त केल्याची माहिती मिळाली.
स्मारक उभारण्यासाठी एमजीएमचे मार्गदर्शन घ्यावेशरद पवार यांनी शिवसेनेचे स्थानिक नेते खैरे आणि महापौर घोडेले यांना ६४ कोटींतून स्मारकाचे काय काम करणार याची माहिती विचारली, तसेच स्मारकाचा आराखडादेखील जाणून घेतला. माजी खा. खैरे यांनी सांगितले, पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. स्मारक उभारण्याबाबत एमजीएमचे मार्गदर्शन घेण्यात येईल. पीएमसी नेमण्यात आली असून, एमजीएमचे मनपाने मार्गदर्शन घ्यावे, याबाबतही पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील.