लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : शरद सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी रविवारी ७९.२५ टक्के शांततेत मतदान पार पडले. मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदान केले. ५२९२ पैकी ४१९४ जणांनी मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महेश सावंत यांनी दिली.२० जागांसाठी ४० उमेदवार रिंगणात होते. २६ सप्टेंबर रोजी मतमोजणी होऊन त्याचदिवशी निकाल जाहीर होईल. शरद सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडीसाठी पैठण तालुक्यातील १७ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. कारखान्याचे संस्थापक माजी आमदार चंद्रकांत घोडके यांच्या मार्गदर्शनाखालील सर्वपक्षीय पॅनल व विद्यमान आमदार संदीपान भुमरे यांच्या पॅनलमधे सरळ लढत असल्याने आज दोन्ही पक्षाचे पुढारी मतदान करून घेण्यासाठी दिवसभर फिरत होते. नवगाव, आवडेउंचेगाव, टाकळीअंबड, हिरडपुरी, विहामांडवा, चौंढाळा, केकतजळगाव, कोळीबोडखा, हिंगणी, कुतुबखेडा, पाचोड, कडेठाण, आडूळ आदी मतदान केंद्रांवर मतदान झाले. आ. भुमरे, काँग्रेसचे रवींद्र काळे, अप्पासाहेब निर्मळ, माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, विनोद बोंबले, नंदलाल काळे, साईनाथ सोलाट आदी तर दुसºया बाजूने माजी आमदार चंद्रकांत घोडके, माजी आमदार संजय वाघचौरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र शिसोदे, माजी उपनगराध्यक्ष अप्पासाहेब गायकवाड, भाऊसाहेब पिसे, अनिल घोडके, तुषार शिसोदे, अरूण काळे, अॅड. बद्रीनारायण भुमरे, गुलदाद पठाण आदी मान्यवर केंद्रांवर फिरुन मतदान करून घेत होते. टाकळी अंबडमध्येही उत्साह होता.
शरद साखर कारखाना; ७९.२५ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:30 AM