छत्रपती संभाजीनगर: किराडपुरा येथील राममंदीराजवळ रात्री झालेल्या दंगलीमुळे राममंदीर परिसरात तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर न डगमगता माजी नगरसेवक इब्राहिम शेख यांनी दरवर्षीप्रमाणे रामभक्तांसाठी शरबतची व्यवस्था केली. हिंदू भाविकांनीही मनात कोणताही द्वेष बाळगताच या स्टॉलवर शरबत पिण्यासाठी गर्दी करीत दोन धर्मियामध्ये दरी निर्माण करू इच्छिणाऱ्यांना एक चपराक दिली.
बुधवारी रात्री किराडपुरा येथे दोन गटात झालेल्या वादानंतर समाजकंटकांनी पोलिसांची वाहने जाळून टाकली. यावेळी जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी गोळीबार करावा लागला होता. याघटनेमुळे दोन भिन्न धर्मियांमध्ये तणाव निर्माण झाला होता. दरवर्षी येथील राममंदीरात श्रीराम जन्मोत्सवाचा कार्यक्रम होत असतो. या कार्यक्रमासाठी हजारो भाविक उपस्थित राहतात आणि दर्शनासाठी सहकुटुंब येत असतात. उन्हाळ्यातील हा उत्सव असल्याने किराडपुरा येथील माजी नगरसेवक इब्राहिम भैय्या हे दरवर्षी भाविकांसाठी शरबत ची व्यवस्था करतात. रात्री झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर राममंदीरासमोरच त्यांनी लावलेला शरबत वाटपाचा स्टॉल हिंदू, मुस्लीमांमध्ये वैर निर्माण करू इच्छिणाऱ्यांसाठी एक चपराक ठरली आहे. इब्राहिम भैय्या आणि त्यांचे सहकाऱ्याकडून हिंदू भाविक मोठ्या विश्वासाने शरबत घेऊन पीत होते. आमदार प्रदीप जैस्वाल यांनी स्वत:या शरबतचा आस्वाद घेत शहरात शांतता राखण्याचे आवाहन केले.
कोणताही द्वेष नाही रामनवमीनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आम्ही दहा वर्षापासून शरबतचा स्टॉल लावतो. येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सेवा करण्याची संधी यानिमित्ताने मिळते. रात्री झालेल्या घटनेनंतर आज लावलेल्या स्टॉलवर शरबत पिण्यासाठी हिंदू भाविकांनी गर्दी केली. यावरून भाविकांच्या मनात मुस्लीमाविषयी कोणताही द्वेष नाही, हे सिद्ध झाले. रात्री झालेल्या घटनेतील समाजकंटक स्थानिक नव्हते. आम्ही शांततेच आवाहन केल्यानंतरही त्यांनी आमच्यावर दगडफेक केली.