औरंगाबाद : शहागंज येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून थेट हेडपोस्ट ऑफिसपर्यंतच्या ( Shahaganj to Head Post office Road In Bad Condition ) रस्त्याची सध्या अत्यंत विदारक अवस्था झाली आहे. महापालिकेने ( Aurangabad Municipal Corporation ) २०१२ मध्ये या रस्त्यावर तब्बल ५ कोटी ६० लाख रुपये खर्च केले. तीन वर्षांत रस्ता खराब झाला, तर परत मोफत डागडुजी करण्याची जबाबदारी कंत्राटदाराची होती; मात्र मागील दोन-तीन वर्षांमध्ये रस्ता खराब झाला. त्यामुळे वाहनधारक, पादचाऱ्यांनाही बराच त्रास सहन करावा लागतोय.
महापालिका प्रशासनाने जुन्या शहरात २०११ मध्ये रस्ता रुंदीकरण मोहीम राबविली. त्यानंतर रस्त्यांची कामे महापालिका निधीतून करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या. निविदा प्रक्रियेला एकही कंत्राटदार प्रतिसाद देत नव्हता. शेवटी शहरातील कंत्राटदारांची तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी बैठक बोलावून प्रत्येक कंत्राटदाराला कामे करण्याचे निर्देश दिले. शहागंज ते भडकलगेट रस्त्यासाठी अरोरा कन्स्ट्रक्शन, चंद्राम आशन्ना यांची नेमणूक करण्यात आली. अंदाजपत्रकीय दरापेक्षा ६.१२ टक्के अधिक दराने हे काम देण्यात आले. ४ कोटी ९१ लाख ३९ हजार या कामाची अंदाजपत्रकीय रक्कम ठरविण्यात आली होती. अरोरा कन्स्ट्रक्शनला ३ कोटी १३ लाख तर चंद्राम आशन्ना यांना १ कोटी ५० लाखांचे काम दिले. नियोजित वेळेत कंत्राटदारांनी कामही पूर्ण केले. प्रारंभी काही वर्षे रस्ता चांगला गुळगुळीत होता. ३ वर्षांनंतर रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडू लागले. मनपाने तात्पुरती सोय म्हणून दरवर्षी डांबरी रस्त्यावर सिमेंट मटेरियल वापरून खड्डे बुजविण्याचा अघोरी प्रयोग केला. त्यामुळे रस्त्याची आणखी वाईट अवस्था झाली. दोन वर्षांपूर्वी मनपाने शासन अनुदानातून भडकलगेट ते हेडपोस्ट ऑफिस कॉर्नरपर्यंतचा रस्ता सिमेंट पद्धतीने तयार केला. त्यामुळे वाहनधारकांना किचिंत दिलासा मिळालेला आहे.
३१७ कोटींत या रस्त्याचा समावेशमहाराष्ट्र शासनाकडून शहरातील रस्त्यांसाठी निधी मिळावा म्हणून ३१७ कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे. शासनाकडून निधी मिळाल्यानंतर शहागंज ते हेडपोस्ट ऑफिस हा रस्ताही गुळगुळीत करण्यात येणार आहे. रस्त्याचा सरफेस बराच खराब झालेला आहे.- एस.डी. पानझडे, शहर अभियंता, मनपा.
निकषानुसार काम पूर्णगांधीपुतळा ते लेबर कॉलनी या रस्त्याचे काम मला मनपाने दिले नव्हते. हे काम आदिनाथ कन्स्ट्रक्शन यांनी केले होते. मला मनपाने गांधी पुतळा ते भडकलगेट रस्त्याचे काम दिले होते. मनपाच्या सर्व निकषानुसार मी काम तेव्हाच पूर्ण केले. रस्त्याच्या गुणवत्तेची मुदत तीन वर्षे होती. या कालावधीत रस्ता चांगला होता. अलीकडेच रस्ता खराब झाला.- विजय अरोरा, अरोरा कन्स्ट्रक्शन
१५ मीटर रुंद रस्ता१५०० मीटर लांब२०१२ मध्ये केले काम०९ वर्षांत मनपाचे रस्त्याकडे दुर्लक्ष