- श्यामकुमार पुरेसिल्लोड: भुसावळ ते पुणे ट्रॅव्हेलबसने पुण्याकडे एक पिस्टल व १० जिवंत काडतुस घेऊन जाणाऱ्या एका अट्टल गुन्हेगारास अजिंठा पोलिसांनी शुक्रवारी रात्री ११.३० वाजता रस्त्यातच ताब्यात घेतले. मयूर सतीश भालेकर ( २८ वर्षे रा.कोथरूड पुणे) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी एकाचा खून करण्याच्या उद्देशाने पुण्याला जात होता अशी, प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.
आरोपी मयूर सतीश भालेकर याच्या विरुद्ध विविध पोलीस ठाण्यात यापूर्वी खूनाचा प्रयत्न करणे, हाफ मर्डर, चोऱ्या , सरकारी वाहनांची जाळपोळ असे गुन्हे दाखल आहेत. चार महिन्यापूर्वीच पुण्याच्या येरवडा जेलमधून तो बाहेर आला होता. तुरुंगात असताना मयूरची एका अट्टल गुन्हेगारासोबत मैत्री झाली होती. त्या मित्राचे एका इसमाकडे काही पैसे बाकी होते. पैसे परत देत नसल्याने त्याच्या खुनाची सुपारी सदर आरोपीने मयुरला दिली होती. त्यासाठी मयूर भुसावळ येथून पुण्याला जात होता. याची गोपनीय माहिती अजिंठा पोलिसांना मिळाली. शुक्रवारी रात्री ११. ३० वाजेला अजिंठा घाटाच्या माथ्यावर ट्रॅव्हेलबस थांबवून झडती घेतली. यावेळी मयूर याच्याकडे १० जिवंत १० काडतुस आणि एक पिस्टल आढळून आले. शस्त्र जप्त करून पोलिसांनी मयूरला अटक केली. त्याच्या विरुद्ध अजिंठा पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. ही कार्यवाही अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे , फौजदार शरद वाघुले, पोहेकॉ अक्रम पठाण, संदीप कोथळकर, संजय कोळी यांनी केली.
चौकशी अंती निष्पन्न होईलखून करण्याच्या उद्देशाने एक आरोपी पिस्टल व जिवंत काडतुस घेऊन बसमध्ये जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरून सापळा रचून आरोपीला पकडण्यात आले आहे. तो खरच कोणाचा खून करणार होता की पिस्टलची तस्करीत करत होता याचा तपास सुरू आहे. - अमोल ढाकणे पोलीस निरीक्षक अजिंठा.