औरंगाबाद : शाळा, महाविद्यालयांतील मुलींच्या संरक्षणासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने मोपेडस्वार महिला कर्मचाऱ्यांचे विशेष गस्ती पथक स्थापन करण्यात आले. ‘ती आणि तिच्यासाठी’ असे या गस्ती पथकाचे नाव आहे. पहिल्या टप्प्यात आठ मोपेडवरून महिला पोलीस गस्त करणार असून, महिनाभरात ही संख्या १६ पर्यंत जाणार आहे.
याविषयी उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे म्हणाल्या की, शहरातील शाळा-महाविद्यालयीन मुली आणि महिलांच्या सुरक्षेला आमचे प्राधान्य आहे. पूर्वी चार्ली महिला पोलीस गस्त करीत. मात्र, चार्ली बंद झाल्यापासून केवळ दामिनी पथकामार्फत गस्त होती. ही बाब लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली मोपेडस्वार महिला पोलिसांची गस्त सुरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यांतर्गत आठ मोपेडवरून प्रत्येकी दोन महिला गस्तीवर असतील.
या सर्व मोपेड महिला पोलिसांच्या असतील. त्यांच्या मोपेडमधील इंधन मात्र सरकारी असेल. शिवाय त्याचे स्वतंत्र लॉगबुकही असेल. गस्तीवरील महिला पोलिसांची संख्या महिनाभरा दुप्पट होईल. शाळा, महाविद्यालय, मुलींचे वसतिगृह आणि निर्जनस्थळी गस्त करण्याचे आदेश मोपेडस्वार महिला पोलिसांना देण्यात आल्याचे उपायुक्तांनी सांगितले.
महाविद्यालयीन मुलींना स्वरक्षणाचे धडेशाळा-महाविद्यालयीन मुलींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिला पोलीस कर्मचारी हे प्रशिक्षण देणार आहेत. पंधरा दिवसांचे हे प्रशिक्षण असेल आणि ५० विद्यार्थिनींच्या ग्रुपला हे प्रशिक्षण दिले जाईल.हे प्रशिक्षण कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. सुरुवातीला पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर हे प्रशिक्षण दिले जात असल्याचे उपायुक्त डॉ. धाटे-घाडगे यांनी सांगितले.