छत्रपती संभाजीनगर : घरगुती कारणातून थेट तिसऱ्या मजल्यावरून उडी मारणाऱ्या महिलेचा सुदैवाने जीव वाचला. मात्र, मणके फ्रॅक्चर झाल्याने दोन्ही पायातील शक्ती गेली. आयुष्यभर दिव्यांग राहण्याची भीती होती. मात्र, घाटीतील अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागातील डाॅक्टरांनी मणक्याची शस्त्रक्रिया करून दोन्ही पायांत पुन्हा जीव आणण्याची किमया केली.
घाटी रुग्णालयातील अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागाच्या वाॅर्डात या महिलेवर उपचार सुरू आहेत. घरगुती कारणावरून रागाच्या भरात या महिलेने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली होती. यात तिचे मणके तर फ्रॅक्चर झालेच, पण त्यामुळे महिलेच्या दोन्ही पायांतील शक्ती गेली. पायाला कोणता स्पर्शही जाणवत नव्हता. अशा परिस्थितीत ही महिला घाटीत दाखल झाली होती. या महिलेवर उपचार आणि शस्त्रक्रिया करण्याचे आव्हान अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागातील डाॅक्टरांनी स्वीकारले आणि यशस्वीही करून दाखविले. फ्रॅक्चर झालेल्या मणक्यात राॅड टाकण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या तीन दिवसांनंतरच ही महिला दोन्ही पायांची हालचाल करू शकली. त्याशिवाय स्पर्शही जाणवण्यास सुरुवात झाली आहे. ही महिला पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे पायावर उभीही राहू शकणार असल्याने कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागप्रमुख डाॅ. एम. बी. लिंगायत यांनी ही शस्त्रक्रिया केली. डाॅ. अब्दुल्ला अन्सारी, डाॅ. स्वप्निल पाटील, डाॅ. अर्शद अली यांच्यासह परिचारिका, कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. अधिष्ठाता डाॅ. संजय राठोड यांचे मार्गदर्शन लाभले.
रुग्णांना उभा करणारा विभाग स्वतंत्र इमारतीतअपघातात हात, पायासह हाडे फ्रॅक्चर झालेल्या गोरगरीब रुग्णांना पुन्हा उभा करणारा विभाग म्हणून अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभाग ओळखला जातो. डाॅ. एम. बी. लिंगायत यांच्यासह डाॅ. अनिल धुळे, डाॅ. मुक्तदिर अन्सारी आदी रुग्णांच्या उपचारासाठी अहोरात्र परिश्रम घेतात. हा विभाग आता ‘सीव्हीटीएस’ विभागाच्या इमारतीत सुरू करण्यात आला आहे.