औरंगाबाद : अँटेलियाजवळील स्कॉर्पिओमध्ये आढळलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात चौकशी करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) मिठी नदीत सापडलेली नंबर प्लेट ही औरंगाबादेतील असल्याचे निष्पन्न झाले आहे.
स्कॉर्पिओमध्ये स्फोटक ठेवल्याचा आरोपावरून सहायक निरीक्षक सचिन वाझे हे एनआयएच्या ताब्यात आहे. आज एनआयएच्या पथकाला मिठी नदीतून एका कारची नंबर प्लेट (एमएच-२० एफपी-१५३९) सापडली. ती नंबर प्लेट हडको एन-१२, छत्रपतीनगर येथील रहिवासी विजय मधुकर नाडे यांच्या मारुती इको कारची असल्याचे निष्पन्न झाले आहे. विजय नाडे हे जालना येथे समाजकल्याण विभागात लिपिक पदावर कार्यरत आहेत. याबाबत विजय नाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, माझी कार १६ नोव्हेंबर २०२० रोजी उद्धवराव पाटील चौकातून चोरी गेलेली आहे. याबाबत सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. कारचा तपास लागला नसून, पोलिसांनी तसा अहवाल न्यायालयात सादर केलेला आहे.