लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तालुक्यातील बळसोंड शिवारातील जमिनीबाबत विधिमंडळात प्रश्न उपस्थित केल्यानंतर ही जमीन शासनजमा करण्याचा आदेश मंत्र्यांनी दिला होता. त्यानुसार कारवाई सुरू असून एकूण जमिनीपैकी २ एकर जमीन शासनजमा झाली आहे. ८ सप्टेंबर रोजी त्याचा फेरही करण्यात आला आहे.हिंगोली तालुक्यातील बळसोंड शिवारात गट क्र.१२ मधील सदर जमिनीबाबत आ.तान्हाजी मुटकुळे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकरणात शर्तभंग झाल्याने त्याची चौकशी करून ही जमीन शासनजमा करण्याचा आदेश महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिला होता. त्यानंतर बराच काळ लोटल्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला की काय, असे वाटत होते. मात्र आता यापैकी ८0 आर जमिनीचे क्षेत्रफळ महाराष्ट्र शासनाच्या नावे करण्याचा आदेश हिंगोलीच्या तहसीलदारांनी १६ जून २0१७ रोजी दिला होता. यात मौजे बळसोंड येथील केशव शेषराव गवळी यांच्या नावावरील ९ हेक्टर ६0 आर पैकी ८0 आर. जमिनीचा शर्तभंग झाल्याचे आदेशात म्हटले होते. त्यानुसार ही जमीन शासन ताब्यात घेवून सातबारावर महाराष्ट्र शासन अशी नोंद घेण्याचा आदेश दिला होता. संबंधितांना नोटिसा बजावून ८ सप्टेंबर रोजी तहसीलदार व मंडळ अधिकारी शेख अल्लाबक्ष यांनी फेर मंजूर केला. बळसोंड सज्जाचे तलाठी गजानन पारिसकर यांनी सातबाराही निर्गमित केला आहे. पोदार शाळेच्या परिसराची ही जागा असल्याचे सांगितले जात असल्याने खळबळ उडाली आहे.
‘ती’ दोन एकर जमीन शासनजमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:47 AM